Sat, Feb 29, 2020 13:43होमपेज › Belgaon › कर्नाटकात फेब्रुवारीत मध्यावधी निवडणूक?

कर्नाटकात फेब्रुवारीत मध्यावधी निवडणूक?

Last Updated: Oct 18 2019 1:49AM
बंगळूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यामध्ये भाजपला सत्ता मिळाल्यास कर्नाटकात फेब्रुवारीमध्ये मध्यावधी निवडणुकीची शक्यता आहे. तशी चर्चा भाजप पक्षश्रेष्ठींमध्ये सुरू आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याकडे काहीसे दुर्लक्ष करण्यात येत होते; पण मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागल्यास येडियुराप्पांकडेच नेतृत्व दिले जाणार आहे. नेतृत्वबदलाचा विचार केल्यास राज्यातील लिंगायत मते फुटण्याची शक्यता आहे. एकाचवेळी एकगठ्ठा मते इतर पक्षाकडे गेल्यास भाजपची पीछेहाट निश्‍चित आहे. यामुळे संभाव्य मध्यावधी निवडणूक येडियुराप्पांच्याच नेतृत्वाखाली घेण्यात येईल. त्यानंतर सत्ता मिळाल्यास वयोमानाचे कारण पुढे करून एखाद्या राज्याचे राज्यपालपद त्यांना देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपची सत्ता आल्यास कर्नाटकात मध्यावधी निवडणुकीची तयारी सुरू होणार आहे. याबाबतचे संदेश प्रदेश भाजपातील प्रमुख नेत्यांना पाठवण्यात आला आहे. राज्यात गतवर्षी मे महिन्यात विधानसभा निवडणूक झाली. भाजपने सर्वाधिक 104 जागा मिळवल्या. पण, बहुमत मिळवता आले नव्हते. सरकार स्थापन करण्याचा दावा करून येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; पण बहुमत सिद्ध करता आले नसल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर काँग्रेस-निजद आघाडी सरकार अस्तित्वात आले. त्यांच्यातील अंतर्गत वाद आणि 15 आमदारांनी केलेल्या बंड-खोरीमुळे सरकार कोसळले. गेल्या 25 जुलै रोजी भाजप सरकार अस्तित्वात आले.

आघाडी सरकार कोसळल्यानंतर सहा महिने राष्ट्रपती राजवट लागू करून त्यानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार भाजप पक्षश्रेष्ठींनी केला होता; पण येडियुराप्पांचा हट्ट मान्य करून पक्षश्रेष्ठींनी सत्ता स्थापन करण्यास मंजुरी दिली.

सरकार सत्तेवर येऊन तीन महिने उलटत आले, तरी अजूनही प्रशासनावर वचक ठेवता आलेला नाही. ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरामुळे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या प्रश्‍नावरुन कोंडीत सापडण्याच्या भीतीने दरवर्षी बेळगावात होणारे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले. सध्या सरकारसमोर अनेक समस्या आहेत. शिवाय अपात्र आमदारांना पक्षप्रवेश देऊन त्यांना योग्य पद द्यावयाचे आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी काही काळ लागणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपला यश मिळाल्यास कर्नाटकातही मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाऊन सर्व समस्यांवर उपाययोजना करण्याची योजना भाजप पक्षश्रेष्ठींनी आखली आहे.