Mon, Jan 18, 2021 10:19होमपेज › Belgaon › जाहीरनाम्यात सीमाप्रश्‍नाचा उल्‍लेख करा

जाहीरनाम्यात सीमाप्रश्‍नाचा उल्‍लेख करा

Published On: Sep 16 2019 1:37AM | Last Updated: Sep 15 2019 11:55PM
बेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तेथील सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात महाराष्ट्र?कर्नाटक सीमाप्रश्‍नाचा उल्‍लेख करून त्याचा पाठपुरावा करावा, या मागणीसाठी सर्व नेत्यांशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शहापूर नाथ पै चौकातील महागणपती मंदिरात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके होते.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागणार आहेत. सीमाप्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. त्याला चालना महाराष्ट्रातील राजकीय पक्षच देऊ शकतात. त्यामुळे या पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात सीमाप्रश्‍नाचा उल्‍लेख करावा. या प्रश्‍नाचा पाठपुरावा करावा, अशी मागणी पत्रांव्दारे करण्याबाबत कार्यकर्त्यांनी मते व्यक्त केली. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठवण्याचा ठराव करण्यात आला.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी सह्यांची मोहीम राबवण्याचा निर्णय झाला. कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार नितिन आनंदाचे, चिटणीस किशोर मराठे, पदाधिकारी किरण हुद्दार, साईनाथ शिरोडकर, विजय जाधव, अश्वजित चौधरी, भावेश बिर्जे, सुधीर शिरोळे, अजय सुतार, संदीप मिराशी, प्रवीण रेडेकर, अभिजित मजुकर, राकेश सावंत, विनायक मोरे आदी उपस्थित होते.