Thu, Sep 24, 2020 07:54होमपेज › Belgaon › महापौर निवडणुकीपासून मराठी गट तटस्थ?

महापौर निवडणुकीपासून मराठी गट तटस्थ?

Published On: Feb 18 2018 1:57AM | Last Updated: Feb 17 2018 11:22PMबेळगाव: प्रतिनिधी

महापौर-उपमहापौरपदासाठी 1 मार्चला निवडणूक होणार आहे. मात्र मराठीगटाला महापौरपदापासून अलिप्त राहावे लागणार आहे. त्यामुळे मराठी सदस्यांनी महापौर निवडणुकीपासून तटस्थ राहण्याबाबत तर उपमहापौरपद दक्षिण भागाला मिळावे, यासाठी हालचाली सुरु केल्याची चर्चा आहे.

मराठी गटाच्यावतीने महापौर आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असताना त्यावर 20 रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, प्रादेशिक आयुक्त मेघण्णावर यांनी 1 मार्च रोजी महापौर-उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महापौर-उपमहापौर निवडणुकीवरुन जोरदार हालचाली सुरु होत्या. मात्र,  मराठी भाषिकांकडे बहुमत असतानाही   महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचा सदस्य नसल्याने सत्तेपासून वंचित राहावे लागणार आहे. मराठी गटाकडे महापौरपदाचा उमेदवार नसल्याचे पाहून विरोधी गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी मराठी सदस्यांना आपल्याकडे वळविण्याचा डावपेच सुरु केला आहे.महापौरपद अनुसूचित जमातीसाठी असून या पदासाठी विरोधी गटातील बसाप्पा चिक्कलदिनी आणि सुचेता गडगुंदी यांची नावे आघाडीवर आहेत. चिक्कलदिनी हे आम. सतीश जारकीहोळी यांचे तर गडगुंद्री या पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचे समर्थक मानल्या जातात. जारकीहोळी बंधूंनी महापौर निवडणुकीवरुन मनपात आपले वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. गडगुंद्री यांना पालकमंत्र्यांबरोबरच आ. फिरोज सेठ यांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सतीश जारकीहोळी यांनी आपल्या सहकार्‍यांकडून मराठी गटातील काहींना चिक्कलदिनींच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सभागृहाच्या अंतिम टप्प्यात मराठी भाषिकांचा रोष नको, या भूमिकेतून मराठी सदस्यांनी महापौर निवडणुकीपासून अलिप्त राहण्याच्या हालचालीही चालविल्या आहेत.त्याचबरोबर उपमहापौरपद आपल्या गटालाच मिळणार असल्याचा विश्‍वास असल्याने मराठी गटातील तीन नगरसेविकांनी लॉबिंग सुरु केले आहे. मात्र मागच्या वेळेस महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदे उत्तर विभागाकडे ठेवण्यात आली होती. त्यामुळे यावेळचे उपमहापौरपद दक्षिण विभागाला मिळावे, अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केली आहे.

मराठी गटाने महापौर निवडणुकीपासून अलिप्त राहण्याबरोबरच गटात अंतर्गत योग्य निर्णय घेऊन उपमहापौरपदाचा उमेदवार निवडल्यास मराठी जनतेच्या मनात असलेला रोष काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र मराठी गटातील धुरंदर जेष्ठांच्या भूमिकेवरच मराठी गटाची मोट घट्ट राहणार की सुटणार, हे अवलंबून आहे.