बेळगाव/कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
जानेवारी महिन्याच्या अखेरीस मुंबईत सीमाप्रश्नी बैठक घेण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करू, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ अधिकार्यांशी भेट घडवून आणावी, अशी विनंती मध्यवर्ती म. ए. समिती शिष्टमंडळाने पवार यांच्याकडे केली. त्यानुसार फेब्रुवारीअखेर बैठक होण्याची शक्यता आहे.
खा. पवार शुक्रवारी (दि. 22) कोल्हापूर दौर्यावर होते. त्यावेळी मध्यवर्ती समिती शिष्टमंडळाने सीमा लढ्यातील अग्रणी नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी पवार यांची भेट घेतली. काही दिवसांत सीमाप्रश्नाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ अधिकारी, वकिलांबरोबर समिती नेत्यांची बैठक होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी यांनी केली.
त्यावर खा. पवार यांनी महिनाअखेरीस मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि 27 जानेवारीला सीमाप्रश्नावरच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला समिती नेत्यांनी यावे, असे सूचवले. पंधरा मिनिटे झालेल्या या चर्चेत इतर महत्वाच्या विषयांवरही चर्चा करण्यात आली. अॅड. राजाभाऊ पाटील, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक उपस्थित होते.
सीमाप्रश्नावरील पुस्तकाचे 27 जानेवारीस प्रकाशन
सीमाप्रश्नावरील पुस्तकाचे प्रकाशन 27 जानेवारी रोजी मुंबई येथे होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुस्तक प्रकाशन करणार असून अध्यक्षस्थानी शरद पवार असणार आहेत. या कार्यक्रमाला मध्यवर्ती समिती पदाधिकार्यांनी उपस्थित राहावे, असे निमंत्रण शरद पवार यांनी दिले. त्यामुळे पुस्तक प्रकाशनानंतर दुसर्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता आहे.