Thu, Jan 21, 2021 01:19होमपेज › Belgaon › महाराष्ट्र कनेक्शन कर्नाटकची डोकेदुखी 

महाराष्ट्र कनेक्शन कर्नाटकची डोकेदुखी 

Last Updated: May 22 2020 1:32AM

संग्रहित छायाचित्रबेळगाव : पुढारी वृत्तसेवा

गुरुवारी राज्यातील 143 जणांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला असून, 96 पॉझिटिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रातून प्रवास करत कर्नाटकात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः मुंबईतून येणार्‍या प्रवाशांमुळे कर्नाटक शासनाची डोकेदुखी वाढली असून, तेथून आलेले बहुतांशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण राज्यातील उडुपी, मंड्या, बळ्ळारी, हासनसह अनेक जिल्ह्यांमध्ये पसरले आहेत.  गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या अति वेगाने वाढत आहे. गुरुवारी दिवसभरात 143 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या 1605 झाली आहे.

यापूर्वी कर्नाटकात तबलिगी, आजमेर कनेक्शनने कोरोनाबाधितांचा आकडा वाढवला होता. परंतु, आंतरराज्य प्रवासाला परवानगी मिळाल्यानंतर मुंबई-पुण्यातून सर्वत्र येणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता वाढणार्‍या रुग्णांचा प्रवास इतिहास कारणीभूत ठरत आहे. गुरुवारी आलेल्या अहवालातील एकूण रुग्णांपैकी उडुपी जिल्ह्यात तब्बल 26 रूग्ण पॉझिटिव्ह आले असून, हे सर्व मुंबईतून येथे दाखल झाल्याचे अहवालात नमूद आहे. यानंतर मंड्या येथील 30 रूग्णांपैकी तब्बल 11 मुंबई आणि 13 महाराष्ट्रातून प्रवास असा उल्लेख आहे.

याशिवाय मुंबईतून बळ्ळारी येथे 8, हासन येथे 11 व कारवार येथे 3 रूग्ण आल्याचे अहवालात नमूद आहे. यामध्ये पुन्हा ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूर येथून आल्याचीही नोंद आहे. इतर मोजक्या रूग्णांची संख्या ही परदेशातील दौरा, आजमेर  कनेक्शन असे आहे. विशेष म्हणजे आता तबलिगी जमातीच्या दिल्ली दौर्‍यातून मिळणार्‍या रूग्णांची संख्या कमी झाली असून, बहुदा ही साखळीच तुटल्याचे दिसून येते. 

कोरोनाची लागण झालेल्यांपैकी आतापर्यंत एकूण 571 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 41 जण कोरोनाबळी ठरले आहेत. मंड्या 33, उडपी 26, हासन 13, बळ्ळारी 11, बेळगाव 9, कारवार 7, बंगळूर शहर 6, मंगळूर 6, दावणगिरी 3, धारवाड 5, विजापूर 1, रायचूर 5, तुमकूर 1, कोलार 2, चिक्‍कबळ्ळापूर 2, इतर ठिकाणी 5 अशी जिल्हानिहाय आकडेवारी आहे.

बुधवारी एकाच दिवशी 7,293 स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 143 जण पॉझिटिव्ह निघाले. सध्या राज्यात एकूण 53 कोविड 19 चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मेअखेरपर्यंत ही संख्या 60 पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आरोख्य खात्याने राखले आहे. दिवसेंदिवस चचणीची क्षमता वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे कोरोनावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवता येणे शक्य असल्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे.