Fri, Feb 28, 2020 23:02होमपेज › Belgaon › लढण्याच्या उर्मीतूनच निवडणूक रिंगणात

लढण्याच्या उर्मीतूनच निवडणूक रिंगणात

Published On: Apr 13 2019 1:41AM | Last Updated: Apr 12 2019 11:15PM
बेळगाव : प्रतिनिधी

सीमालढ्याला 60 वर्षांचा कालावधी उलटला आहे. तरीदेखील सीमाभागातील मराठी जनतेची लढण्याची ऊर्मी तिळभरदेखील कमी झालेली नाही. हे दाखविण्यासाठी म. ए. समितीने 45 उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी दिले असल्याचे प्रतिपादन मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले.बेळगाव लोकसभा मतदारसंघ  निवडणुकीत उभारलेल्या म. ए. समितीच्या 45 उमेदवारांची प्रचारसभा शुक्रवारी ओरिएंटल स्कूलच्या सभागृहात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून दीपक दळवी बोलत होते.व्यासपीठावर कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, प्रकाश मरगाळे, एल. आय. पाटील उपस्थित होते.

दळवी म्हणाले, समोर पराभव दिसत असताना लढण्याला सिद्ध होणे, यामागे फार मोठा त्याग आहे. लढण्याची हिंमत आहे. जय मिळविण्यासाठी लढणारे खूप असतात. परंतु, पराभव असताना होणार आहे, हे माहीत असून लढणारे महत्त्वाचे असतात. ज्यावेळी सीमालढ्याचा इतिहास लिहिला जाईल. त्यावेळी या 45 उमेदवारांची नोंद घ्यावी लागेल. समितीने कोणतीही अनुकूल परिस्थिती नसताना लढण्याची हिंमत दाखविली आहे. यासाठी सामान्य माणसांनी पदरमोड करून निधी उभारला आहे. संस्कृती, भाषा आणि स्वाभिमान गहाण ठेवून गुलाम होणार नाही, हे दाखविण्यासाठी निवडणूक रिंगणात आहे.

माजी आ. मनोहर किणेकर म्हणाले, सरकार आणि प्रशासनाकडून मराठी भाषिकांवर अन्यायाचा वरवंटा फिरविण्यात येत आहे. मराठी भाषिकांचे अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. रिंगरोडसाठी शेती संपादित करून शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याला लोकशाहीमार्गाने सडेतोड उत्तर देण्यासाठी निवडणूक लढवण्यात येत आहेत. मराठी भाषिकांनी 45 उमेदवारांनाच मतदान करावे. उमेदवारांनी रिंगणात उतरून आपले कर्तव्य पार पाडले आहे . आता त्यांना मतदान करण्याची जबाबदारी मराठी भाषिकांची आहे. अ‍ॅड. राजाभाऊ पाटील म्हणाले, समितीच्या एका हाकेने 45 उमेदवार अर्ज दाखल करतात. ही गोष्ट अभूतपूर्व अशीच आहे. मराठी भाषिकांना लोकेच्छा प्रकट करण्याची संधी मिळाली आहे. न्यायालयात 60 वर्षानंतरही लढ्याची धार तितकीच तीव्र असल्याचे यातून दाखविण्यात येणार आहे. यासाठी मराठी मतदारांनी समिती उमेदवारांच्या पाठीशी थांबावे.

गुणवंत पाटील, शुभम शेळके, शंकर पाटील, श्रीकांत कदम, किरण धामणेकर,गणेश दड्डीकर यांनीही सूचना मांडल्या. बैठकीला जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, ता. पं. सदस्य एन. के. नलवडे, के. वाय. घाटेगस्ती, यल्लाप्पा रेमाण्णाचे, संतोष मंडलिक, राजू किणेकर, विजय पाटील, बी. डी. मोहनगेकर आदी उपस्थित होते. एल. आय. पाटील यांनी आभार मानले.