Sat, Feb 29, 2020 13:42होमपेज › Belgaon › म. ए. समितीही लोकसभा रिंगणात

म. ए. समितीही लोकसभा रिंगणात

Published On: Mar 28 2019 1:37AM | Last Updated: Mar 28 2019 1:37AM
बेळगाव : प्रतिनिधी

सीमाप्रश्‍नाकडे देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे बेळगाव लोकसभा मतदारसंघातून 101 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. सीमालढा हा लोकचळवळ बनावी, यासाठी लोकवर्गणीच्या माध्यमातून उमेदवारासाठी आवश्यक असणारा निधी उभारण्याचा निर्णयही बुधवारी  घेण्यात आला. 

लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीची बैठक मराठा मंदिरात झाली.  अध्यक्षस्थानी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी होते. व्यासपीठावर कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, माजी आ. अरविंद पाटील, प्रकाश मरगाळे,  ता. म. ए. समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार, निपाणी म. ए. समिती अध्यक्ष जयराम मिरजकर उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीमध्ये समितीने उमेदवार द्यावा, अथवा अनेक उमेदवार उभारावेत, अशी मागणी कार्यकर्त्यांतून करण्यात आली होती.  त्याबाबत बैठकीत चर्चा झाली.  त्यानंतर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला. समितीच्या  या निर्णयामुळे राष्ट्रीय पक्षांना हादरा बसला आहे. 

दळवी म्हणाले, सीमाप्रश्‍नाचा लढा सनदशीर मार्गाने सुरू आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये समितीने उमेदवार द्यावा, अशी मागणी होत आहे. त्यानुसार सीमालढ्याला चालना देण्यासाठी बेळगाव लोकसभा मतदारसंघातून 101 हून अधिक अर्ज दाखल करण्यात येतील. यासाठी लोकवर्गणीतून निधी उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून सीमाप्रश्‍न या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न आहे. बेळगाव शहर, तालुका, खानापूर, निपाणी परिसरातील कार्यकर्ते बेळगाव लोकसभेसाठी अर्ज दाखल करतील. यातून सीमाप्रश्‍नाला चालना मिळेल.

कार्याध्यक्ष किणेकर म्हणाले, राष्ट्रीय पक्षांनी सीमावासीयांना सातत्याने सापत्नभावाची वागणूक दिली. यामुळे मराठी जनतेत चीड आहे. सीमालढ्याला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे.  रिंगरोडच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न सुरू आहे. याविरोधात कोणत्याही राष्ट्रीय पक्षांनी आवाज उठविलेला नाही. या निषेधार्थ लोकसभा निवडणूक लढविण्यात येणार असून प्रत्येक गावातून एक अथवा दोन उमेदवार अर्ज दाखल करतील.

प्रकाश मरगाळे म्हणाले, समितीने लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक अर्ज दाखल केल्यास सीमालढ्याला गती येणार आहे.