Thu, Sep 24, 2020 07:53होमपेज › Belgaon › प्रेयसीच्या नातेवाईकांकडून प्रियकराला विजेचा शॉक

प्रेयसीच्या नातेवाईकांकडून प्रियकराला विजेचा शॉक

Published On: Jun 24 2019 1:28AM | Last Updated: Jun 24 2019 12:53AM
बेळगाव : प्रतिनिधी

इतरांसारखेच त्यानेही एका तरुणीवर प्रेम केले. परंतु, या प्रेयसीच्या घरच्यांना ते रुचले नाही. घराणे थोडे  मातब्बर असल्याने त्यांनी या प्रेमविराला गाव सोडायला लावले. एवढ्यावरच त्या घराण्याचे समाधान झाले नाही. धारवाड जिल्ह्यातील या तरुणीच्या कुटुंबीयांनी बेळगावात येऊन त्या प्रियकराचे अपहरण करून बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी या प्रियकराला चक्‍क विजेचा शॉक दिला. यामध्ये त्याची किडनी खराब झाल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. या प्रकरणी माळमारुती पोलिसांत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मडीवाळ अशोक रायबागकर (26) असे या दुर्दैवी प्रियकराचे नाव आहे. 

धारवाड जिल्ह्यातील गरग येथील एका तरुणाचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेम जुळले. परंतु, हे प्रेम मुलीच्या  घरच्यांना आवडले नाही. त्या तरुणाला इतका त्रास दिला की तो सहा महिन्यांपूर्वी गाव सोडून बेळगावातील गांधीनगर परिसरातील मारुतीनगर येथे आई-वडिलांसमवेत राहू लागला.

अपहरण करून त्रास

सदर तरुण गाव सोडून आला, तरी तो आपल्या मुलीच्या संपर्कात असल्याचा संशय पुन्हा प्रेयसीच्या घरच्यांना आला. शनिवारी सहाजण बेळगावात आले. त्यांनी तरुणाला कारमध्ये घालून दूरवर घेऊन गेले. त्याला प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास दिला. त्याच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या असून, शरीराचा काही भाग निळा पडला आहे. इतक्यावरच न थांबता त्याला उच्च दाबाचा विजेचा शॉकही दिला आहे. याशिवाय त्याची गावाकडील मालमत्ता त्यांनी लिहून घेतल्याचेही या तरुणाने पोलिसांना सांगितले. 

सहाजणांवर गुन्हा, शोध सुरू

सदर तरुण बेळगावात गांधीनगर परिसरात राहत असल्यामुळे व येथूनच तरुणाचे अपहरण झाल्याने तरुणाच्या पालकांनी माळमारुती पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर या घटनेचा तपास करीत आहेत. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, 

डॉक्टरांनी त्याच्या किडणीची हालचाल बंद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिल्याचे सांगितले. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्यांचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

फोनवर धमकीनंतर अपहरण 

गेल्या काही दिवसांपासून मडीवाळला फोनवरून प्रेयसीच्या घरच्यांकडून धमकी दिली जात होती. परंतु, आपण गाव सोडल्याचे सांगून तो त्यांचे फोन टाळत होता. सदर तरुणीचे लग्न ठरले असूनही तरुण संपर्कात असल्याचा संशय मुलीच्या कुटुंबीयांना  असल्याने ते संतप्त बनले होते. त्यामुळेच त्याचे अपहरण करून इतका शारीरिक त्रास दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.