Sat, Feb 29, 2020 19:10होमपेज › Belgaon › खडीमशिन वादातून धुमश्‍चक्री; महिला ठार

खडीमशिन वादातून धुमश्‍चक्री; महिला ठार

Published On: May 31 2018 1:35AM | Last Updated: May 31 2018 12:40AMरायबाग : प्रतिनिधी

नंदीकुरळी (ता. रायबाग) येथील खडीमशीन बंद करण्याच्या मागणीवरून सुरू झालेला वाद विकोपाला गेल्याने जमावाने केलेल्या दगडफेकीत मंगळवारी रात्री एका महिलेचा बळी गेला. त्यानंतर संतप्‍त झालेल्या एका गटाने बुधवारी रायबाग शहर बंद करण्याचा प्रयत्न केला; पण बंदला हिंसक वळण लागल्याने जमावाने केलेल्या दगडफेकीत काही बसेसच्या काचा फुटल्या. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. 

नंदीकुरळी गावातील सी. एच. वीरराज अँड कंपनीची खडीमशीन आहे. ती बंद करण्याच्या मागणीसाठी गावातील मुल्तानी कुटुंबातील सदस्य काही नेत्यांसमवेत धरणे आंदोलन करीत होते. मंगळवारी रात्री मुल्तानी कुटुंबीयांनी मशिनच्या प्रांगणात जाऊन ती बंद करण्याची मागणी केली. त्यावेळी मशिनमालकाच्या समर्थकाशी जोरदार वादावादी झाली. त्यानंतर दोन्ही गटांकडून जोरदार दगडफेक झाली. दगडफेकीत मुल्तानील कुटुंबातील रेहमतबी मीरासाब मुल्तानी (वय 25) या महिलेचा मृत्यू झाला. याबद्दल मुल्तानी कुटुंबाकडून रायबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बुधवारी एका गटाने खडीमशिन बंद करण्याची  मागणी करीत रायबाग बंद पुकारला.  पण रायबाग बसस्टँडवर जमावाने दगडफेक केली. काही बसेसच्या काचा फोडण्यात आल्या.  स्टँडवरील कंट्रोलरूमच्या खिडकीच्या काचा आणि कॉम्प्युटरही फोडण्यात आला.  जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. दगडफेकीत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तालुका इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. 

मृत महिलेला न्याय मिळेपर्यंत मृतदेह शवचिकित्सेसाठी देणार नाही, असा हट्ट महिलेच्या कुटुंबियांनी आणि रयत संघटनेने धरला होता. त्यानंतर तहसीलदार आणि उपपोलिसप्रमुखांनी शांतता बैठक घेऊन नागरिकांनी शांत केले. 

आंदोलन आधीपासूनच

नंदीकुरळी गावात चार-पाच खडीमशिन असून आधीपासूनच त्या बंद करण्यासाठी आंदोलने करण्यात येत आहेत. मशिन बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ व शेतकरी संघटनेने रायबाग मिनी विधानसौधजवळ आठवडाभर धरणे सत्याग्रह केला होता. 

21 जणांवर तक्रार

रायबाग पोलिस ठाण्यात 21 जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या शिवाय आणखी दोन तक्रारी नोंद करण्यात आल्या आहेत. रायबाग शहरात पोलिसांनी जमावबंदीचा आदेश लागू करून कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

20 जणांना अटक

जिल्हा पोलिसप्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांनी दंगलप्रकरणी 20 पेक्षा जास्त आंदोलकांना अटक केली आहे. तसेच आांदोलकांच्या सर्व मोटारसायकली जप्‍त केल्या आहेत.