Thu, Jul 09, 2020 07:50होमपेज › Belgaon › प्रचार थंडावला, गाठीभेटी सुरू

प्रचार थंडावला, गाठीभेटी सुरू

Last Updated: Dec 04 2019 1:05AM
बंगळूर : प्रतिनिधी

राज्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांमध्ये गुरुवारी (दि. 5) पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठीची  जाहीर प्रचारधुमाळी मंगळवारी (दि. 3) समाप्‍त झाली. बुधवारी  घरोघरी प्रचार करण्याची मुभा असणार आहे.

निवडणूक जाहीर झाल्यापासून आतापर्यंत राज्यातील तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांतील नेत्यांनी उत्साहाने प्रचार केला. सभा, रोड शोचे आयोजन केले होते. आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. तिन्ही पक्षांसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची असून प्रत्येक पक्षाने विरोधकांवर  मात करण्यासाठी डावपेच आखले आहेत. आजी, माजी मुख्यमंत्री, मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी प्रत्येक जिल्ह्यांत दोन ते तीनवेळा दौरा केला.

जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर जय-पराजयाचा हिशोब सुरू झाला आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी गुप्‍तचर खात्याकडून अहवाल मागवला आहे. प्रत्येक मतदारसंघात  असणार्‍या वातावरणाची माहिती ते घेत आहेत. अपात्र ठरवण्यात आलेल्या आमदारांचा मतदार तिरस्कार करतील, असा विश्‍वास काँग्रेस आणि निजदला आहे. पण, 9 डिसेंबर रोजी यावर उत्तर मिळणार आहे.

15 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 4185 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. महिला आणि अंधांसाठी 9 मतदान केंद्रे स्थापन केली आहेत. निवडणुकीसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 900 संवेदनशील केंद्रे आहेत. 2,511 सीआरपीएफ पोलिसांसह एकूण 42,509 जणांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. मतदानापूर्वी 78 तास आधी कोणत्याही प्रकारचे निवडणुकीसंबंधीचे सर्वेक्षण प्रसारित करु नये, अशी सूचना राज्य मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांनी दिली आहे.

चोख पोलिस बंदोबस्त

बेळगाव ः प्रतिनिधी  

जिल्ह्यात तीन मतदारसंघांत होणार्‍या पोटनिवडणुकांसाठी पोलिस खात्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, एएसआय यांच्यासह इतर कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर केएसआरपी, सीएएफ, डीएआर तुकड्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील अथणी, कागवाड आणि गोकाक या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होत असून यामध्ये अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्यात     आले आहे. त्यानुसार मतदार संघात पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 6 डीएसपी, 13 पोलिस निरीक्षक, 33 पोलिस उपनिरीक्षक, 62 एएसआय, 1143 हेडकॉन्स्टेबल, 991 होमगार्ड अशा प्रकारे एकूण 2248 जणांची नेमणूक करण्यात आली आहे. याबरोबरच 15 डीएआरच्या तुकड्या, 15 केएसआरटी, 8 सीएपीएफच्या तुकड्या नियुक्‍त करण्यात आल्या आहेत. 

प्रत्येक विधानसभा मतदार संघात 5 डीआरच्या  तुकड्या, 5 केएसआरपी, तुकड्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तर सीएपीएफच्या अथणी येथे 2 तुकड्या, कागवाड येथे 3 तुकड्या,  गोकाक येथे 3 तुकड्या नेमणूक करणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख यांनी दिली आहे.