होमपेज › Belgaon › सत्ताधार्‍यांकडून स्वागत, विरोधकांकडून टीका

सत्ताधार्‍यांकडून स्वागत, विरोधकांकडून टीका

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 16 2018 11:49PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्याच्या अर्थसंकल्पाचे सत्ताधार्‍यांकडून स्वागत व विरोधांकडून टीका करण्यात आली. तर औद्योगिक क्षेत्राला भरीव तरतूद नसल्याने उद्योजकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली. 

मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामुळे राज्यातील उद्योग, कृषी, आरोग्य, शिक्षणासह सर्वच क्षेत्रांना न्याय मिळणार आहे. मागील चार वर्षांपासून अनेक लोकप्रिय योजना यशस्वीरीत्या  राबविल्या आहेत. गरीब  शेतकरी व कामगार, सर्व समान्य लोकांना डोळ्यासमोर हा अर्थसंकल्प मांडल्यामुळे भविष्यात याचा नागरिकांना फायदा होणार आहे.
-प्रकाश हुक्केरी, खासदार

सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. कृषी, शिक्षण, पत्रकार, क्रीडा आदींसाठी चांगल्या सुविधा देण्यात आल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रासाठी भरीव योजना देणे गरजेचे होते. शेतकर्‍यांसाठीही भरीव योजना आहेत. लोकप्रिय अर्थसंकल्प आहे. 
-अनिल कालकुंद्रीकर, अर्थतज्ज्ञ

सिद्धरामय्या सरकारने आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे जनतेच्या डोळ्यात धुळफेक आहे. दरवर्षीपेक्षा यंदाचा अर्थसंकल्प मोठा आहे. एवढा निधी आणणार कोठून. हा जनतेवरच बोजा आहे. 
-सुरेश अंगडी, खासदार

केवळ बंगळूरलाच मोठ्या प्रमाणात निधीची तरतुद करून उत्तर कर्नाटकावर अन्याय केला आहे. बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असताना सिंचन क्षेत्र वाढविण्याबाबत ठोस निधीची तरतुद केली नाही. 
-डॉ. प्रभाकर कोरे, खासदार

राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे जुन्या योजना आणि नव्याने मांडणे असेच म्हणावे लागेल. विधानसभा निवडणूकीसाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी असताना सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे जनतेची फसवणूकच आहे. 
-संजय पाटील, आमदार

काँग्रेस सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा ऐतिहासीक अर्थसंकल्प म्हणावा लागेल. मुलींसाठी पदवीत्तर स्तरांपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय हा महिला सबलीकरणासाठी धाडसाचा निर्णय आहे.  
-अंजली निंबाळकर, 
अध्यक्षा राज्य बालभवन 

यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी, शैक्षणिक, पत्रकार आदी क्षेत्रामध्ये भरीव तरतुद आहे. शेतकर्‍यांसाठी अनेक योजना आहेत. विद्यार्थ्यांना मोफत पास, विद्यार्थींनीना मोफत शिक्षण, पत्रकारांसाठी विमा आदी चांगल्या योजना आहेत. उत्तम दर्जाचा अर्थसंकल्प मांडला आहे.
-लक्ष्मी हेब्बाळकर, 
राज्य महिला काँग्रेस अध्यक्षा 

राज्याचा अर्थसंकल्प लोकहिताचा असून कोणालाही भार होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. कृषी क्षेत्राला प्राधान्य दिले असून शिक्षण, पत्रकारिता, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन धनात वाढ केली आहे, हे स्वागतार्ह आहे. 
-आ. सतीश जारकीहोळी 

शेतकरी, व्यापारी, दीनदलित अशा सर्व घटकांचा विचार करुन सिद्धरामय्या सरकारने अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामुळे कोणत्याही घटकावर बोजा टाकला गेला नाही हे विशेष.
 -आ. फिरोज सेठ