Sun, Sep 27, 2020 00:02होमपेज › Belgaon › लग्‍नाच्या आमिषाने जवानाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लग्‍नाच्या आमिषाने जवानाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Last Updated: Dec 16 2019 1:15AM
बेळगाव : प्रतिनिधी

लग्‍नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा तरुण मिलिटरी जवान असून, त्याच्याविरोधात खडेबाजार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. कृष्णा बसाप्पा कलभावी (वय 24, रा. खणगाव, ता. गोकाक) असे संशयित तरुणाचे नाव आहे.

याबाबत खडेबाजार पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खणगाव येथील कृष्णा व याच गावातील एका अल्पवयीन मुलीचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध  होते. सुट्टीवर आल्यानंतर कृष्णाने तिला अनेक ठिकाणी फिरायला नेले होते. 

सदर युवती बैलहोंगल येथे शिक्षणासाठी राहते. सप्टेंबरमध्ये तो बैलहोंगल येथून दुचाकीवरून  तिला घेऊन बेळगावातील खडेबाजारमधील एका लॉजवरही गेला होता. सदर युवतीने त्याच्यामागे लग्न करण्याची गळ घातल्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. यामुळे तरुणीच्या आईने रविवारी खडेबाजार पोलिस ठाण्यात जाऊन सदर तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही युवती मागासवर्गीय असल्याने संबंधित तरुणावर अ‍ॅट्रॉसिटीसोबतच बाल अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक धीरज शिंदे अधिक तपास करत आहेत. सदर जवान सध्या सुटीवर असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी हे प्रकरण बैलहोंगल पोलिस ठाण्याकडे वर्ग केले जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.

पहिल्यांदाच दिसले पीपल फ्रेंडली पोलिस

कृष्णाने या युवतीला ज्या लॉजमध्ये आणले होते ते मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. परंतु, युवतीची आई  खडेबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याने तिने खडेबाजार ठाणे गाठले. येथील निरीक्षक धीरज शिंदे यांनी कोणतेही आढेवेढे न घेता मुलीच्या आईची फिर्याद लिहून घेतली. आधी फिर्याद लिहून घ्या, ठाण्याचे नंतर बघा, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी आदेश बजावले आहेत. त्याचे उदाहरण पहिल्यांदाच खडेबाजार पोलिस ठाण्यात पाहायला मिळाले. निरीक्षक धीरज शिंदे यांचा आदर्श घेऊन असे पीपल फ्रेंडली अधिकारी प्रत्येकाने होण्याची गरज आहे.
 

 "