Wed, Sep 23, 2020 22:47होमपेज › Belgaon › कुन्नूर येथे स्वतंत्र पोलिस चौकीची उभारणी कधी ?

कुन्नूर येथे स्वतंत्र पोलिस चौकीची उभारणी कधी ?

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 07 2018 7:59PM

बुकमार्क करा
निपाणी : मधुकर पाटील 

निपाणी ग्रामीण पोलिस स्थानकाच्या अखत्यारित येणार्‍या व अनेक गावांचे मध्यवर्ती ठिकाण असणार्‍या कुन्नूर येथे स्वतंत्र आऊट पोस्ट सुरु व्हावे, ही गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी असून आऊट पोस्ट सुरु होणे काळाची गरज आहे. या मार्गावरून अनेक अवैध व्यावसायिक आपले नेटवर्क चालीत असून याला आळा घालण्याची गरज आहे. 

महामार्गावर कोगनोळी येथे पोलिस चौकी असली तरी या कार्यालयाची कामगिरी समाधानकारक नाही. मात्र येथे कार्यालय असल्याने अवैध व्यावसायिकांना या कार्यालयाची भीती आहे.

कुन्नूर गाव दूधगंगा नदीकाठावर वसले आहे. या गावापासून काही अंतरावर नदीपात्राच्या पलीकडे असणार्‍या मांगूर गावची हद्द संपताच महाराष्ट्राची हद्द सुरू होते. तर या गावापासून पूर्वेला गेलेल्या बारवाड, कारदगा, बोरगाव, बोरगाववाडी व तेथून कसनाळ, माणकापूर, ढोणेवाडीमार्गे इचलकरंजीला जाता येते. या गावच्या परिसरातील नदीपात्राच्या अलीकडील गावांचा समावेश निपाणी ग्रामीण पोलिस स्थानक तर नदीपात्रांच्या पलिकडील गावांचा समावेश सदलगा पोलिस स्थानक  अंतर्गत येतो. 

कुन्नूर गावावरून महाराष्ट्रातील बहूतेक अनेक गावांशी संपर्क साधता येतो. बेकायदा दारू विक्री व वाहतूक करणारे, मटका घेणारे तसेच अंमली पदार्थाची तस्करी करणारे या गावाचा आधार घेतात. कारण निपाणी ते कुन्नूर या मार्गावर मुळातच पोलिस खात्याचा संपर्क कमी येतो. 

त्यामुळे निवडणुकीच्या काळात येथे स्वतंत्ररित्या पोलिस अथवा अबकारी विभागाची चौकी स्थापन केली जाते. या काळात यापूर्वी अनेक रक्कमेचा दारूसाठा अबकारी विभागाने मोठ्या प्रमाणात जप्त केला आहे. तर पोलिस यंत्रणेने चंदनासह गुटख्याची तस्करीही हाणून पाडली आहे. या सर्व घटना पाहता, या विभागात स्वतंत्र पोलिस चौकी आवश्यक आहे.