Sat, Feb 29, 2020 19:04होमपेज › Belgaon › 2020 मध्ये लीज संपणार्‍या  खाणींचे व्यवहार गुंडाळा

2020 मध्ये लीज संपणार्‍या  खाणींचे व्यवहार गुंडाळा

Published On: Apr 13 2018 1:14AM | Last Updated: Apr 13 2018 1:14AMपणजी : प्रतिनिधी

केंद्रीय खाण मंत्रालयाने 2020 साली मुदत संपुष्टात येत असलेल्या खाण लिजांचे व्यवहार गुंडाळण्याची पूर्वतयारी सुरू करण्याचे आदेश राज्य खाण व भूगर्भ खात्याला दिले आहेत. या खाणींच्या लीजची मुदत संपल्यानंतर त्यांचा खुला लिलाव केला जाणार  असून या पूर्वतयारीसाठी खाण खात्याला 1 एप्रिल 2019 पर्यंतची मुदत दिली असल्याचे आदेशात म्हटले आहे. केंद्रीय खनिज संवर्धन आणि विकास (दुरुस्ती) कायदा-2015 नुसार, ज्या खाणींची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत संपते, त्यांचा व्यवहार वेळेआधी पूर्ण करण्यासाठी ‘इंडियन ब्युरो ऑफ माईन्स’लासर्व प्रक्रियेचा आराखडा तयार करून त्याची मान्यता घेणे गरजेचे आहे. यासाठी सदर खाणींचे व्यवहार गुंडाळण्याची सर्व आवश्यक प्रक्रिया 1 एप्रिल 2019 पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश मंत्रालयाने दिला आहे. याशिवाय या मुदतीत सदर खाणींचे डिजिटल मॅपिंगही पूर्ण करण्याचे मंत्रालयाने सांगितले आहे. 

केंद्रीय खाण मंत्रालयाचे संयुक्त सचिव निरंजन के. सिंग यांनी 11 एप्रिल रोजी गोव्यासह, आंध ्रप्रदेश, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थान आदी राज्यांच्या सरकारलाही सदर आदेश पाठवला आहे. राज्याच्या खाण सचिवांच्या नावेे पाठवण्यात आलेल्या सदर आदेशात, म्हटले आहे की, राज्यातील काही खाणींची मुदत 31 मार्च 2020 रोजी संपुष्टात येत आहे. या खाणी बंद झाल्यानंतर खनिजाचा पुरवठा अचानक ठप्प होऊ नये, यासाठी सदर खाणींचा वेळेत लिलाव करणे आवश्यक आहे. यासाठी सदर खाणींचा व्यवहार वेळेवर गुंडाळण्यासाठी केंद्र सरकारने आतापासूनच प्रक्रियेला सुरुवात  केली आहे. 
Tags :In 2020, lease-bogging, mills, closed ,belgaon news