होमपेज › Belgaon › बेळगावात जीएसटी बिले देण्याकडे दुर्लक्ष

बेळगावात जीएसटी बिले देण्याकडे दुर्लक्ष

Published On: Dec 16 2017 1:40AM | Last Updated: Dec 15 2017 10:53PM

बुकमार्क करा

बेळगाव : महेश पाटील

बेळगाव शहरामधील विविध हॉटेल्स आणि संस्था तसेच ज्यांना जीएसटीची कार्यप्रणाली लागू करण्यात आली आहे. अशा जवळपास 80 टक्के व्यापार्‍यांनी ही प्रक्रिया लागू केलेली नाही. विषेशकरून उद्यमबागमधील उद्योजक,  शहरातील हॉटेलचालक यांच्याकडून जीएसटीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

बेळगाव शहरातील बर्‍याच शाकाहारी, मासांहरी हॉटेलमधून जेवण किंवा अल्पोपाहार केल्यानंतर पूर्वीप्रमाणेच बिल आकारण्यात येत आहे. सदर बिलावर जीएसटीचा कोठेही उल्लेख करण्यात येत नाही. वर्षभरापूर्वी जी बिले मुद्रित करण्यात आली आहेत. आजही त्यांचाच वापर केला जात आहे. त्यामुळे ग्राहकांची लूट होत आहे. त्यामुळे ग्राहकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

बेळगावातील बहुसंख्य हॉटेल्समधून जीएसटीचा क्रमांक नसतानाच बिले देण्यात येत आहे. यासंदर्भात विचारणा केली असता अद्याप आम्हाला जीएसटीचा क्रमांक आलेला नाही. त्यामुळे आम्ही जीएसटीनुसार बिल आकारणी करू शकत नाही.  हवेतर आम्ही देत असलेले बिल घेऊन जाऊ शकता, असे उत्तर देण्यात येत आहे. जीएसटी अंमलात आणल्यानंतर हॉटेल्समध्ये जेवण केल्यास केवळ पाच टक्के जीएसटी आकारणे गरजेचे आहे. ग्राहकांची दिशाभूल करून अन्य मार्गाने ही रक्कम व्यावसायिकांकडून उखळली जात आहे.  

क्लब रोड येथे असलेल्या आयकर विभागाने आपल्या कार्यालयाचे नाव जीएसटी कार्यालय असे केले आहे. मात्र, या जीएसटीच्या माध्यमातून महसूल उत्पन्न करण्याबाबत म्हणावी तशी कार्यवाही होत नाही. या कार्यालयातील काही अधिकार्‍यांचे हॉटेल व्यावसायिक तसेच उद्योजकांशी लागेबांधे असल्याने चालढकल होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

बर्‍याच अधिकार्‍यांना बेळगाव शहर व परिसरातून उद्योजक व व्यावसायिकांकडून मासिक हप्त्यांची रवानगी होत असल्याने जीएसटी लागू करण्याबाबत चालढकल होत आहे. सर्वसामान्यांवर कर भरण्याबाबत दांडगाई करणार्‍या अधिकार्‍यांकडून जीएसटीबाबत मात्र, चालढकल करण्यात येत आहे. याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात क्लब रोड येथील जीएसटीच्या आयुक्तांशी संपर्क साधला असता कोणतेही प्रत्युत्तर मिळाले नाही. ही प्रक्रिया बरीच किचकट असल्याने त्याला काही कालावधी लागणार आहे. असे या कार्यालयातून नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले.