Mon, Jan 18, 2021 10:11होमपेज › Belgaon › मला मुख्यमंत्रिपद आता पुरे : कुमारस्वामी

मला मुख्यमंत्रिपद आता पुरे : कुमारस्वामी

Published On: May 25 2019 2:08AM | Last Updated: May 25 2019 2:08AM
बंगळूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. तुमच्या पक्षातील कोणाला मुख्यमंत्री करता त्याला करा; परंतु मला मुख्यमंत्रिपद नको, अशी विनंती त्यांनी फोनवरून  केल्याची माहिती मिळाली. 
तथापि, राहुल गांधींनी त्यांची समजूत काढताना मुख्यमंत्रिपद तुम्हीच समर्थपणे सांभाळता. त्यामुळे असा विचार करू नका, असे सांगितल्याचे समजते. 

वर्षाभरापूर्वी सत्तेत आलेल्या काँग्रेस-निजद आघाडीला लोकसभेची प्रत्येकी एक जागा मिळाली असून, भाजपने तब्बल 25 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे नाराज मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. 

गुरुवारी रात्री त्यांनी राहुल गांधींना फोन केला. ते म्हणाले,  राज्यात आघाडीची दयनीय अवस्था झाली आहे. दोन्ही पक्षांतील वरिष्ठांमध्ये  सलोख्याची भावना नसणे, हेच मुख्य कारण आहे. मला मुख्यमंत्रिपद हवे, असा हट्ट मी धरला नव्हता. शिवाय काँग्रेससोबत युतीची देखील निधर्मी जनता दलाच्या अनेक आमदार व नेत्यांचीही नव्हती. तरीही आपले वडील देवेगौडांच्या सांगण्यावरून तुमच्यासोबत आघाडी केलेली आहे. सरकार अस्तित्वात येऊन मी मुख्यमंत्री झाल्यापासून तुमच्या नेत्यांनी माझे हात बांधून घातले आहेत. चोहोबाजूंनी माझी कोंडी होत असताना एकजूट होऊन जनतेच्या राज्यातील विकासकामे करणे शक्य नाही. अस्वस्थ राहून मुख्यमंत्री पदावर राहणे योग्य वाटत नाही. मला  मुख्यमंत्रिपदाची आसक्ती नाही. तुम्ही तुमच्या पक्षातील कोणाला मुख्यमंत्री करता त्याला करा, आमच्या पक्षाचा बाहेरून पाठिंबा राहील. 

कुमारस्वामींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राहुल गांधींनी त्यांची समजूत काढली. अशा कठीण परिस्थितीत तुम्ही राजीनामा दिला तर तुमच्या ताकदीने हे पद सांभाळणारा दुसरा नेता नाही. भविष्यात काँग्रेसकडून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, सर्व बाबतीत सहकार्य मिळेल, याची हमी मी घेतो. त्यामुळे राजीनामा देण्याचा तुमचा निर्णय मागे घ्या, असे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राजीनामा देण्याचा विचार मागे घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.