Tue, Jan 19, 2021 23:04होमपेज › Belgaon › टिपू सुलतान जयंती रद्दबाबत फेरविचार करा 

टिपू सुलतान जयंती रद्दबाबत फेरविचार करा 

Last Updated: Nov 07 2019 1:51AM
बंगळूर : प्रतिनिधी

टिपू सुलतान जयंतीवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पण, त्याबाबत फेरविचार करावा. पुढील जानेवारीपर्यंत याविषयी  कळवावे, अशी सूचना उच्च न्यायालयाने सरकारला केली.
टिपू जयंती रद्द केल्याच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना विभागीय खंडपीठाने वरील सूचना दिली. पुढील सुनावणी 3 जानेवारी 2020 रोजी हेाणार आहे. तोपर्यंत सरकारकडून टिपू जयंती रद्द का केली आणि यापुढे त्याबाबत कोणता निर्णय घेणार? याविषयीची माहिती द्यावी लागणार आहे.

न्यायमूर्ती   म्हणाले, सुनावणीच्या  या टप्प्यावर सरकारला कोणतेच निर्देश देता येणार नाहीत. सरकारने घटनेच्या पालनासाठी योग्य ती कार्यवाही करावी. काही बदल करावयाचे असतील तर त्यासाठी योग्य प्रक्रिया राबवण्यात यावी. अचानक आदेश जारी करू नये. राज्य शासनाकडून 28 जयंत्या साजर्‍या केल्या जातात. पण, टिपू जयंतीच का रद्द केली? असा प्रश्न न्यायालयाने विचारला. 

सरकारच्या या निर्णयामुळे दुजाभाव दिसून येतो. कोणतेही धोरण बदलावयाचे असेल, तर त्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करावा, असेही न्यायालयाने सांगितले. टिपू जयंतीवेळी कोडगूमध्ये हिंसाचार झाला होता. केवळ या कारणास्तव टिपू जयंती रद्द करणे चुकीचे असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले. बिलाल अली शाह, टिपू सुलतान युनायटेड फ्रंट आणि टिपू राष्ट्रीय सेवा संघाने याचिका दाखल केली होती.