Fri, Feb 28, 2020 23:58होमपेज › Belgaon › केवळ नावालाच हायटेक, सुविधांचा अभावच

केवळ नावालाच हायटेक, सुविधांचा अभावच

Last Updated: Nov 08 2019 12:12AM
चिकोडी : काशिनाथ सुळकुडे

जिल्हास्तरीय केंद्राकडे वाटचाल करणार्‍या चिकोडी शहरातील प्रवाशांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्चून चिकोडीत हायटेक बसस्थानक  उभारण्यात  आले. पण, या  बसस्थानकात अस्वच्छता, पिण्याचे पाणीसह अनेक समस्या भेडसावत असल्याने चिकोडी बसस्थानक केवळ नावालाच हायटेक बसस्थानक म्हणण्याची वेळ आली आहे.

या बसस्थानकावरुन बंगळूर, बेळगाव, हुबळी, विजापूर, कोल्हापूर, सांगली, मुंबई, पुणेसह इतर मोठ्या शहरांना व ग्रामीण भागांना जाणार्‍या बस  धावतात. त्यामुळे नेहमी प्रवाशांची गर्दी असते. याचाच विचार करुन  माजी खा. प्रकाश हुक्केरींनी सरकारकडून निधी मंजूर करुन हायटेक बसस्थानक उभारले. या हायटेक बसस्थानकाचे उद्घाटन तत्कालीन परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्याहस्ते पार पडले.   पण अवघ्या दोन वर्षातच या बस स्थानकाला अनेक समस्यांनी ग्रासले असून  प्रवाशांसह कर्मचार्‍यांची गैरसोय होत आहे. बस स्थानकात स्वच्छतेचा अभाव असून   ठिकठिकाणी पिचकारीने  रंगलेल्या भिंती आढळतात. तसेच सर्वत्र पाण्याच्या बाटल्या  व कचर्‍याचा खच दिसून येतो. शौचालये व स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करण्यात येत नसल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. 

पिण्याच्या पाण्याचा अभाव 

कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या बस थानकात  प्रवाशांसाठी पिण्यासाठी नळ बसविण्यात आले आहेत. पण, त्या  नळांना  पाणी नसून ते मोडकळीस आले आहे. त्यामुळे प्रवाशांना पाण्यासाठी बसस्थानकाबाहेर जावावे लागते. यामुळे अनेकदा बस  मिळत नाही. यामुळे हायटेक बस स्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी प्रवाशांतून होत  आहे. 

सीसीटीव्हीची गरज 

चिकोडी शहरात रोज शिक्षण, नोकरी, कामासाठी शेकडो लोक बसने येत असतात. त्यामुळे नेहमी चिकोडी बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. या गर्दीचा फायदा अनेक खिसेकापू, चेनस्नॅचिंगच्या घटना घडतात. त्यामुळे या बसस्थानकावर सीसीटीव्ही बसविण्याची  गरज आहे. 

पोलिस चौकी आवश्यक  

ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालयांना शिक्षणासाठी विद्यार्थी  चिकोडी  शहरात येत असतात. त्यामुळे नेहमी सकाळी व सायंकाळी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. या वेळेत रोडरोमिओंकडून मुलींना छेडण्याच्या घटना घडतात. महाविद्यालयीन तरुणांच्या गटांकडून हाणामारीदेखील होत असते. अशावेळी पोलिस  येण्यास उशीर होऊन मोठ्या घटना घडत असतात. त्यामुळे येथे पोलिस कर्मचार्‍यांची नेमणूक करण्याची गरज आहे. 

टाईल्स, बांधकाम कोसळतेय 

हायटेक बसस्थानकासमोर थांबण्यासाठी घालण्यात आलेले काँक्रिट निघत आहे. तसेच शेजारी ग्रामीण बस सेवेसाठी उभारण्यात आलेल्या बसस्थानकातील टाईल्स निघाल्या आहेत. प्रवाशांना बसण्यासाठी बांधण्यात आलेला कट्टा  ढासळला आहे.

पार्किंगला शिस्त आवश्यक 

बसस्थानकाच्या सुरुवातीला पार्किंग करण्यासाठी जागा निश्‍चित करण्यात आली आहे. यासाठी एका व्यक्तीला टेंडर देण्यात आला होते. पण पार्किंगचे निटके नियोजन नसल्याने कोठेही वाहने पार्किंग करण्यात येतात. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.