Wed, Aug 12, 2020 20:53होमपेज › Belgaon › हेल्मेट सक्ती हवी कायमस्वरूपी

हेल्मेट सक्ती हवी कायमस्वरूपी

Published On: Jan 18 2018 1:48AM | Last Updated: Jan 17 2018 11:32PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहरात 27 जानेवारीपासून पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासंबंधीचे आदेश उत्तर विभाग पोलिस महानिरीक्षक आलोककुमार यांनी दिले आहेत. गतवर्षी 6 फेब्रुवारीला न्यायाधीश आर. जे. सतीशसिंग यांनी हेल्मेटसक्तीसंबंधी पोलिसदलाला आदेश दिले होते. मात्र, काही महिन्यांनंतर त्यात सातत्य दिसून आले नाही. यामुळे कायमस्वरुपी हेल्मेट सक्तीला अडचण काय, असा प्रश्‍न शहरवासियांना पडला आहे. 

शहरात सोमवारी (दि.27) पासून हेल्मेट सक्ती व वाहतूक नियम मोडणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. यामुळे बर्‍याच महिन्यांपासून बंद असलेली हेल्मेट सक्तीची कारवाई पुन्हा सुरु होणार आहे. गतवर्षी फेब्रुवारीत सुरु केलेली हेल्मेट सक्ती काही महिन्यांतच बंद पडली. त्यामुळे यावेळी तरी कायमस्वरूपी हेल्मेट सक्ती केली जाईल का, असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे. 
‘आयएसआय’ प्रमाणित हेल्मेट वापरण्याचा दंडक असल्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराला दर्जेदार हेल्मेट खरेदी करावी लागणार आहे. त्याचबरोबर मागे बसणार्‍या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक आहे.  
शहरातील यंदे खुट, धर्मवीर संभाजी चौैक, चन्नमा सर्कल, गोवावेस सर्कल, सीबीटी, अशोक सर्कल, आरटीओ सर्कल, कोल्हापूर सर्कल, गोगटे सर्कल, अरगन तलाव, गणेशपूर रोड आदी ठिकाणी हेल्मेट सक्ती, वाहतूक नियम  तसेच कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.   

शहरात यापूर्वी अनेकवेळा हेल्मेट सक्ती केली गेली आहे. मात्र, सातत्य दिसून आले नाही. यावेळी 27 जानेवारीपासून कारवाईला सुरुवात करण्यात येणार असून विनाहेल्मेट, विनापरवाना व नियमबाह्य वाहने चालविणार्‍यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. या कारवाईत किती दिवस राहते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.