Sat, Feb 29, 2020 20:06होमपेज › Belgaon › हुश्श... ओसरला जोर!

हुश्श... ओसरला जोर!

Published On: Sep 09 2019 1:30AM | Last Updated: Sep 09 2019 1:40AM
बेळगाव : प्रतिनिधी

चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने रविवारी दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली. त्यामुळे पुराच्या भीतीखाली वावरणार्‍या लोकांना तसेच गणेशभक्‍तांनाही काहीसा दिलासा मिळाला. रविवारी नद्याच्या पाणीपातळीत वाढ न झाल्याने नदीकाठ सुखावला, तर पावसाचा जोर ओसरल्याने शहरवासीय सोमवारपासून सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

चार दिवसांपासून संततधार पावसाने पुन्हा जनजीवन विस्कळीत होते काय, अशी अवस्था निर्माण झाली होती. राकसकोप धरणाची पाणी पातळी वाढल्याने दोन दरवाजे उघडून पाणी मार्कंडेय नदीच्या पात्रात सोडण्यात आले होते. नदीकाठच्या नागरिकांना पुन्हा सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, रविवारी पावसाचा जोर कमी झाल्याने शिवारात पाणी येण्याची शक्यता कमी झाली.

नविलतीर्थचा विसर्ग

नविलतीर्थ धरणातून 22,600 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने सौंदत्ती तालुक्यातील औरादी, सुन्नाळ, सुरेबान आदी गावांना धोका निर्माण झाला आहे. औरादीमधील लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. या ठिकाणी खबरदारी घेण्याची सूचना अधिकार्‍यांना देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाने नविलतीर्थमधून कोणत्याही वेळी पाणी सोडण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. आसपासच्या ग्रामस्थांना नदी काठी जाऊ नये, असे कळविले होते. आता पाणी सोडण्यात आल्याने धोका निर्माण झाला असून पूरग्रस्तांना निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात येत आहे. याकरिता जिल्हा आणि तालुका प्रशासनाने आवश्यक व्यवस्था केली आहे. या धरणाचा इनफ्लो रविवारी सकाळी 22,600 क्युसेक होता. इतक्याच प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे.

चोर्ला, अनमोड घाट खुले

गोव्याला बेळगावशी जोडणारे अनमोड आणि चोर्ला हे दोन्ही घाट रविवारी खुले झाले. अनमोड घाटातून शनिवारी सायंकाळपासूनच एकेरी वाहतूक सुरू केली. दुचाकी आणि हलक्या चारचाकी वाहनांना या घाटातून प्रवेश आहे. मात्र, अवजड वाहनांना नाही. तर चोर्ला घाट दरड कोसळून रविवारी बंद झाला होता. मात्र, गोवा सरकारने आपल्या हद्दीत एक जेसीबी कायमस्वरूपी थांबवून ठेवला असून, दरडी हटवण्याचे काम तातडीने केले जात आहे. त्यानुसार शनिवारी दरड कोसळल्यानंतर तातडीने जेसीबी कामाला लावून दरड हटवण्यात आली. त्यामुळे बेळगाव-चोर्ला-गोवा मार्ग वाहतुकीला खुला झाला.

वास्को-लोंढा रेल्वेमार्ग खुला 

रामनगर : दूधसागर, सोनावळी स्टेशनच्या मधील भागातील 11 नंबर बोगद्याजवळ शनिवारी सायंकाळी 4 वा. दरड कोसळल्याने हा मार्ग बंद झाला होता. दरड शनिवारी रात्री युद्धपातळीवर हटवून रविवारी सकाळी हा रेल्वे मार्ग खुला करण्यात आला. सुरुवातीला मालगाड्या  व नंतर पॅसेंजर गाड्या सोडण्यात आल्या. 

‘अलमट्टी’तून 2 लाख  30 हजार क्युसेक विसर्ग

विजापूर : प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढल्याने अलमट्टीतूनही विसर्ग वाढविण्यात आला आहे. शनिवारी 1.85 लाख क्युसेक विसर्ग होता, तर रविवारी दुपारी 3.30 वा. तो वाढवून 2.30 लाख क्युसेक करण्यात आला. महाराष्ट्रातील संभाव्य पूर टाळण्यासाठी विसर्ग वाढविल्याचे मानले जाते.

काही दिवसांपूर्वी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यावेळी पूर टाळण्यासाठी दोन्ही राज्यांमध्ये समन्वय वाढविण्याचे ठरले होते. त्यानुसार अलमट्टीतून तातडीने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. रविवारी धरणाचे सारे दरवाजे उघडण्यात आले. अलमट्टीत रविवारी 1.65 लाख क्युसेक पाण्याची आवक झाली. पण, पूर टाळण्यासाठी विसर्ग त्यापेक्षा जास्त वाढविण्यात आला आहे.

ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर अलमट्टीचे सर्व 26 दरवाजे उघडले होते. त्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा पश्‍चिम महाराष्ट्र व परिसरात होत असलेल्या पावसाने कृष्णेच्या पातळीत वाढ झाली आहे. शिवाय, विविध धरणांतून विसर्ग वाढल्याने अलमट्टी धरणातील आवक वाढली आहे. त्यामुळे रविवारी पुन्हा एकदा सर्व 26 दरवाजे उघडण्यात आले.