बंगळूर, बेळगाव : प्रतिनिधी
शिक्षणाबरोबर आता मेडिकल हब अर्थात वैद्यकीय उपचारांचे केंद्र बनण्याच्या वाटेवर असलेल्या बेळगाव शहरात हृदयरोग आणि कॅन्सर रुग्णालय स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्याबरोबरच बेळगावात भाषा कौशल्य केंद्रही स्थापन करण्यात येणार आहे. बेळगाव आणि खानापूर शहरांत माता-शिशु रुग्णालय आणि संकेश्वरजवळ कणगल्यात औद्योगिक वसाहत विकसित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय भाषणात या घोषणा केल्या.
बेळगावात सुपर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय स्थापन करण्याची घोषणा गेल्या दोन वर्षांपूर्वीच्याच अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यानुसार कामही सुरू झाले आहे. मात्र, नवे हृदयरोगचिकित्सा आणि कॅन्सर रुग्णालय याच सुपर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच भाग असणार की स्वतंत्र रुग्णालय असणारे, हे स्पष्ट झालेले नाही.
याबरोबरच बेळगाव आणि खानापूरमध्ये माता-शिशु रुग्णालयही उभारण्यात येणार आहे. बेळगाव जिल्ह्यात माता-शिशु मृत्यू दर कर्नाटकात अत्याधिक आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. संकेश्वरजवळच्या कणगल्यात औद्योगिक वसाहत विकसित करण्यात येणार आहे. सध्या कणगल्यात हिंदुस्तान लेटेक्स आणि हिंदुस्तान पेट्रोलियमचे भरणाकेंद्र असे दोन मोठे उद्योग आहेत. आणखी उद्योग उभे रहावेत, यासाठी वसाहत विकसित करण्यात येईल.