होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्या प्रकरण : मोबाईल सर्किटद्वारे स्फोटाचा कट

गौरी लंकेश हत्या प्रकरण : मोबाईल सर्किटद्वारे स्फोटाचा कट

Published On: Jun 24 2018 1:32AM | Last Updated: Jun 24 2018 12:03AMबंगळूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांनी मोबाईल सर्कीट वापरून स्फोट घडविण्याचा कट रचला होता. त्यासाठी एका मित्राची मदत घेण्याची तयारी त्यांनी केली होती, अशी कबुली गौरी हत्या प्रकरणात सर्वप्रथम अटक करण्यात आलेल्या के. टी. नवीनकुमार या संशयिताने दिली.

नवीनकुमारबरोबर प्रवीण आणि इतर तिघेजण मद्दूर (जि. मंड्या) येथे 13 जानेवारी 2018 रोजी भेटले. त्या ठिकाणी नवीनचा मित्र अनिलकुमार याची भेट त्यांनी घेतली. मोबाईल सर्कीटबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली. अनिलला त्यांनी तसे सर्कीट बनविण्यास सांगितल्याचे समजते. 

नवीनने इतरांना अनिलकुमारची ओळख करून दिली. अनिलने श्रीरंगपट्टण येथे मोबाईल विक्री आणि दुरुस्ती करत असल्याचे सांगितले. मोबाईल सर्कीटबद्दल माहिती नाही; पण डिस्प्ले तयार करता येतो. हवे तर मोबाईल सर्कीट बनविण्याचे प्रशिक्षण घेण्याची तयारी अनिलने दाखविली होती. पण, नंतर पोलिसांची चौकशी तीव्र झाल्यामुळे हा कट मागे पडला. 

कोठडीसाठी प्रयत्न

परशुराम वाघमारेची पोलिस कोठडी सोमवार (दि. 25) रोजी संपुष्टात येणार आहे. अधिक चौकशी करावयाची असल्याने त्याला आणखी काही दिवस ताब्यात देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार असल्याची माहिती एसआयटीच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

11 जूनला परशुरामला अटक करण्यात आली. त्यानंतर 12 जूनपासून त्याला चौदा दिवसांची कोठडी देण्यात आली. ती मुदत आता संपणार आहे. परशुरामने चौकशीसाठी सहकार्य केल्याने आतापर्यंत गतीने तपास करणे शक्य झाले आहे. मात्र, त्याच्याबरोबर या प्रकरणात अटकेत असणारे संशयित अमोल काळे, अमित दिग्वेकर, सुजीतकुमार, मनोहर येडवे यांची लाय डिटेक्टर चाचणी घेण्यासाठी परवानगी देण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात येणार आहे. परवानगी मिळाल्यास   गुजरातमधील गांधीनगरातील फॉरेन्सिक लॅबोरेटरीत ही चाचणी केली जाणार आहे. या प्रकरणातील आणखी तिघा संशयितांची रेखाचित्रे काढून ती संपूर्ण राज्यातील पोलिस ठाण्यांना पाठविण्यात आली आहेत.