Fri, Jul 10, 2020 17:29होमपेज › Belgaon › बेळगाव : वडापावच्या दुकानात सिलिंडरचा स्फोट

बेळगाव : वडापावच्या दुकानात सिलिंडरचा स्फोट

Last Updated: Nov 18 2019 1:25AM
बेळगाव : प्रतिनिधी
शनि मंदिराजवळील वडापाव दुकानात सिलिंडरमधून गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये दुकानातील साहित्यासह दुचाकी जळून सुमारे चाळीस हजारांचे नुकसान झाले. रविवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास घडलेल्या या स्फोटानंतर शनि मंदिर परिसर हादरून गेला.

शनि मंदिराच्या बाजूला असणाऱ्या कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या वळणावर रोहित चंद्रशेखर चव्हाण - पाटील यांच्या मालकीची अपार्टमेंट आहे. याच्या खालील बाजुच्या गाळ्यात रमेश नारायण उचगावकर यांनी चार दिवसांपूर्वीच वडापाव सेंटर सुरू केले होते. रविवारी सायंकाळी नेहमीसारखे त्यांनी वडे तळण्यासाठी गॅस शेगडी सुरु केली असताना यावेळी अचानक सिलिंडरला गळती सुरू झाली. ही गळती अधिकच वाढत गेल्याने आग भडकली. त्यामुळे रमेश येथून बाहेर पळत जाऊन दूरवर थांबले. आजूबाजूच्या लोकांनी माती घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाढलेल्या गळतीमुळे दोन मिनिटांनी सिलिंडरचा जोरात स्फोट झाला. हा आवाज परिसरातील बघ्यांच्या कानठळ्या बसविणारा होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

या स्फोटामुळे दुकानातील कपाट, टेबल-खुर्च्या यासह अन्य साहित्य जळून सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले, शिवाय इमारती समोर लावण्यात आलेली दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामध्ये दुचाकीचे १५ हजारांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

...तर मोठा अनर्थ 
रमेश उचगावकर यांनी या इमारतीत वडापाव सेंटरसाठी गाळा घेतला होता, वडे व भजी तळण्यासाठी ते समोरील जागेचा वापर करत. रविवारी देखील ते बाहेरील बाजूस वडे व भजी तळत होते. सिलिंडरला आग लागल्यानंतर जेव्हा त्याचा स्फोट झाला, तेव्हा सिलिंडर बाहेरील बाजूस होते. शिवाय भरलेले एक सिलिंडर आतील बाजूस ठेवले होते. जर हा स्फोट आतील बाजू झाला असता तर इमारतीस धोका पोहोचून मोठा अनर्थ घडला असता. परंतु, स्फोट बाहेर झाल्याने मोठा अनर्थ टळल्याचे अग्निशामक दलाचे मुख्य हवालदार एम. एम. कवडी यांनी सांगितले.