Thu, Sep 24, 2020 07:05होमपेज › Belgaon › अथणीतून मंगसुळी, कागवाडला कागे

अथणीतून मंगसुळी, कागवाडला कागे

Last Updated: Nov 18 2019 1:46AM
बेळगाव : प्रतिनिधी

चुरस असलेल्या काही मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांना शनिवारी रात्री उशिरा तिकीट जाहीर केले. यामध्ये अथणीतून गजानन मंगसुळी, कागवाडमधून राजू कागे, तर गोकाकमधून लखन जारकीहोळी यांच्या तिकिटावर शिक्‍कामोर्तब झाले. हे तिघेही सोमवारी शक्‍तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेची पोटनिवडणूक चुरशीने होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. सोमवारी शेवटच्या दिवशी काँग्रेस - भाजपचे उमेदवार भव्य शक्‍तिप्रदर्शन करून आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी काँग्रेस नेते, भाजपचे केंद्रीय आणि राज्यातील मंत्री  उपस्थित राहणार आहेत. गोकाकमध्ये निघणार्‍या मिरवणुकीमध्ये माजी मंत्री आ. सतीश जारकीहोळी हे सहभागी होणार आहेत.
भाजपतर्फे गोकाकसाठी रमेश जारकीहोळी हे शक्‍तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र हरकुणी उपस्थित राहणार आहेत. 

अथणीमध्ये भाजपतर्फे महेश कुमठळ्ळी, कागवाडसाठी श्रीमंत पाटील हे शक्‍तिप्रदर्शन करून मिरवणुकीद्वारे आपला उमेदवारी अर्ज  भरणार आहेत. यावेळी पालकमंत्री जगदीश शेट्टर, ग्रामीण विकासमंत्री के. एस. ईश्‍वराप्पा आदी उपस्थित राहणार आहेत. दिग्गज नेते मंडळी येणार असल्यामुळे सर्वच पक्षांतर्फे शक्‍तिप्रदर्शन दिसणार आहे. अथणी आणि कागवाडमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

तेरा अपात्र आमदार भाजपतर्फे उमेदवारी दाखल करणार आहेत. त्यांच्यासह काही दिग्गज नेते सोमवारी उमेदवारी दाखल करतील. भाजपतर्फे एच. विश्‍वनाथ (हुनसूर), के. सी. नारायणगौडा (के.आर.पेठ), शिवराम हेब्बार (यल्‍लापूर), अरुणकुमार गुत्तूर (राणेबेन्नूर), बी. सी. पाटील (हिरेकेरुर), रमेश जारकीहोळी (गोकाक), श्रीमंत पाटील (कागवाड), महेश कुमठळ्ळी (अथणी), आनंद सिंग (विजयनगर), डॉ. के. सुधाकर (चिक्‍कबळ्ळापूर), एम.टी.बी.नागराज (हासकोटे), के. गोपालय्या (महालक्ष्मी ले-आऊट), श्रवण (शिवाजीनगर), एस. टी. सोमशेखर (यशवंतपूर), भैरती बसवराज (के.आर.पुरम उमेदवारी दाखल करणार आहेत.

काँग्रेसने शनिवारी रात्री दुसरी उमेदवारी यादी जाहरी केले असून, ते सर्वजण अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करतील. गजानन मंगसुळी (अथणी), भरमगौडा (राजू) कागे (कागवाड), लखन जारकीहोळी (गोकाक), व्यंकटराव घोरपडे (विजयनगर), रिझवान अर्शद (शिवाजीनगर), के. बी. चंद्रशेखर (कृष्णराज पेठ) हे सर्व नेते अर्ज दाखल करतील.

पोटनिवडणुकीसाठी हालचाली गतिमान

काँग्रेस-निजद आघाडी सरकार कोसळण्यास कारणीभूत ठरल्याने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून तत्कालीन विधानसभा सभापतींनी 17 आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यांनी दाखल केलेल्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर निकाल जाहीर केल्यानंतर 15 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी हालचाली गतिमान झाल्या. गेल्या दोन दिवसांत सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर केली असून शेवटच्या दिवशी ते सर्वजण अर्ज दाखल करणार आहेत.

 "