Tue, Aug 11, 2020 21:50होमपेज › Belgaon › चार लाख लोकांना फटका

चार लाख लोकांना फटका

Published On: Aug 14 2019 11:36PM | Last Updated: Aug 14 2019 11:36PM
बेळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पुराचा आतापर्यंत 4 लाख 14 हजार 411 लोकांंना फटका बसला आहे. तर दीड लाख हेक्टर म्हणजे तीन लाख 75 हजार एकरांमधील पीक पाण्याखाली आहे. शिवाय तेरा जणांना जीव गमवावा लागला असून, चौघे जण बेपत्ता आहेत. तर, राज्यात 103 तालुक्यांमध्ये पूर असून, 58 जणांचा मृत्यू झाला आहे.

बेळगाव जिल्ह्यामध्ये 4 ऑगस्टपासून आलेल्या पुरामध्ये आणि अतिवृष्टीमध्ये सापडलेल्यांसाठी 449 निवारा केंद्रे उघडण्यात आली आहेत. 1 लाख 81 हजार 830 लोकांना निवारा देण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला आहे. एकूण 377 गावे पूरग्रस्त आहेत. पूर आणि अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी अग्निशामक दल, एसडीआरएफ, गृहरक्षकदल यांचे 95 जवान तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर एनडीआरएफचे 183 लोक काम करीत आहेत. लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे 800 जवान अद्याप पुनर्वसन कामात गुंतले आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत 4 लाख 14 हजार 411 जणांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले.

दीड लाख हेक्टर पिक पाण्याखाली 

4 ऑगस्टनंतर जिल्ह्यात  आलेल्या पूर आणि अतिवृष्टीमुळे 1 लाख 57 हजार 301 हेक्टर क्षेत्रातील पिके अद्याप पाण्याखाली आहेत. अतिवृष्टीमुळे 274 जनावरांचा बळी गेला आहे. 2665 कि.मी. चा रस्ता खराब झाला असून 512 लहान-मोठे ब्रिज पाण्याखाली गेले आहेत. 286 पाणी पुरवठा यंत्रणा ठप्प झाल्या आहेत.

103 तालुके पूरगस्त

बंगळूर : प्रतिनिधी

बेळगावसह राज्यतील 103 तालुक्यांमध्ये पूर स्थिती असल्याचे सरकारने घोषित केले आहे. पुरामुळे आतापर्यंत एकूण 58 जणांचा मृत्यू झाला आहे. 15 जण बेपत्ता असून 859 जनावरांचा मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी पावसान उसंत घेतली असून आता पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे आव्हान शासनापुढे आहे.

उत्तर कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट, विजापूर, रायचूर, यादगिरीत पूर स्थिती गंभीर आहे. पावसामुळे राज्यात सुमारे 50 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात एकूण 6.97 लाख पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 1160 निवारा केंद्रांमध्ये 39 लाख पूरग्रस्तांनी आश्रय घेतला आहे. स्थलांतर करण्यात आले आहे. 51 हजार जनावरांचे रक्षण केले आहे. 4.58 लाख हेक्टर जमिनीतील पिके नष्ट झाली आहेत. 56 हजार घरे कोसळली आहेत.

निवारा केंद्रांमध्ये शासनातर्फे तसेच समाजसेवी संस्थांतर्फे नाश्ता, जेवण देण्यात येत आहे. पण, अनेक ठिकाणी पूरग्रस्तांना अन्नासाठी कसरत करावी लागत आहे. बागलकोट जिल्ह्यातील मिर्जी निवारा केंद्रात वेळेत जेवण मिळत नसल्याने पूरग्रस्तांनी पीडीओ नरसण्णावर आणि तलाठी कित्तूर यांना धारेवर धरले. 

चिकोडी तालुक्यामध्ये 1681 शाळांची हानी 

पावसामुळे राज्यातील सुमारे 5 हजार शाळा महाविद्यालय इमारती कोसळल्या आहेत. यामध्ये चिकोडीतील सर्वाधिक 1681 शाळा, महाविद्यालयांचा समावेश आहे. कृष्णेच्या पाण्यामुळे हा फटका बसला असून, बुधवारीही काही गावांना पाण्याचा वेढा कायम होता. कारवार, कोडगू, उडपी, चिक्‍कमंगळूर, शिमोगासह अनेक जिल्ह्यांमध्ये महापुरामुळे काही शाळा-महाविद्यालय इमारती कोसळल्या आहेत. बेळगाव 1300, बागलकोट 732, धारवाड 315, हावेरी 127, हासन 522, विजापूर येथे 13 शाळा-महाविद्यालयांच्या इमारती कोसळल्या आहेत.

तीस शाळा अद्याप पाण्याखालीच 

बेळगाव : जिल्ह्यातील तीस शाळा अद्याप पाण्याखाली असून, त्या शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी गुरुवारी स्वातंत्र्यदिन सोहळा पूरग्रस्तांच्या निवारा केंद्रात साजरा करावा, असा आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. जिल्ह्यातील 371 गावे अद्याप पाण्याखाली आहेत. तर, तीस शाळा पाण्याखाली असून, अनेक शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. अशा ठिकाणी स्वतंत्र्यदिनाचा सोहळा न करता तो पूरग्रस्तांच्या निवारा केंद्र किंवा जवळ खुली जागा असल्यास त्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात यावे, अशा सूचना मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. बेळगाव शहरामध्येही एक शाळा पाण्याखाली असून, या शाळेचा सोहळाही कल्याण मंटपमध्ये करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुराचा सर्वाधिक फटका चिकोडी विभागाला बसला आहे. या विभागात अनेक शाळा धोकादायक अवस्थेत असल्यामुळे त्याची पडताळणी करूनच तेथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात यावा, असा आदेशही देण्यात आला आहे.