Tue, May 26, 2020 14:04होमपेज › Belgaon › सिद्धरामय्यांमुळे सरकार पडले 

सिद्धरामय्यांमुळे सरकार पडले 

Last Updated: Feb 19 2020 11:33PM
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

कुमारस्वामी यांचे सरकार माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि तत्कालीन विधानसभा सभापती रमेशकुमार यांच्यामुळेच पडल्याचा आरोप माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी पत्रकार परिषदेत केला. येडियुराप्पा यांचे सरकार पाडण्यात मला काहीही स्वारस्य नाही. विकासासाठी या सरकारने आपला कालावधी पूर्ण करावा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

येथील विश्रामगृहात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी निधर्मी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष शंकर मुडलगी, पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष नासीर बागवान, अशोक पुजारी आदी उपस्थित होते.

देवेगौडा म्हणाले, कुमारस्वामी यांचे सरकार अस्थिर करण्यासाठी प्रथमपासूनच भाजप प्रयत्नशील होते. सिद्धरामय्या आणि तत्कालीन विधानसभा सभापती रमेशकुमार यांच्या प्रयत्नांमुळेच चांगले चाललेले कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्यात आले. ही माहिती त्यावेळी आपल्याला बंडखोरी करत मुंबईमध्ये वास्तव्यास गेलेल्या आमदारांनीच दिली होती. आता याबाबत बोलून काय उपयोग, तेव्हा मी अधिक काही बोलणार नाही. 

येडियुराप्पा यांच्या कार्यकाळात अधिकार्‍यांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी सरकारजवळ पैसा नाही. सरकारकडून मात्र पुरेसा निधी असल्याचे वेळोवेळी जाहीर करण्यात येते. याबाबत त्यांनी श्‍वेतपत्रिका जारी करावी. 

भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. विकास करण्यासाठी त्यांना वेळ दिला पाहिजे. राज्यातील भाजप सरकार पाडण्यामध्ये मला स्वारस्य नाही. या सरकारने आपला कालावधी पूर्ण करावा, अशी माझी इच्छा आहे.राज्याचा विकास करण्यासाठी आमचे त्यांना सहकार्य असणार आहे.  

प्रादेशिक पक्षामुळे गतीने विकास होते हे आतापर्यंत दिसून आले आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि दिल्लीचे सरकार हे त्याचेच द्योतक आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांची ताकद वाढली पाहिजे. प्रादेशिक पक्षांना एकत्र करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

जनता दलाचे जी. टी. देवेगौडा यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत ते म्हणाले की, या निवडणुकीसाठी पक्षाने कोणताही व्हीप जारी केला नव्हता. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी सवदींना साथ दिली असावी. आता पुढे कोणाबरोबर जायचे त्यांनीच ठरवावे. यावेळी फैजुल्‍ला माडीवाले, प्रकाश सोनवलकर, सुभाष पुजारी, सी.एन. धनराज आदी उपस्थित होते.

87 व्या वर्षातही पक्षासाठी काम...

देवेगौडा म्हणाले की आज माझे वय 87 वर्षे आहे. या वयातही मी पक्षासाठी काम करीत आहे. लवकरच राज्यात बैठका घेऊन पक्षाची पुनर्रचना करून पक्ष भक्‍कम करू. 1989 मध्ये 18 पैकी 16 खासदार आपले निवडून आले होते. राजकारणात जय, पराजय  होत असतात. आता आम्ही जोरदार तयारी करून 2023 च्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करू.