बंगळूर : प्रतिनिधी
म्हैसूरमधील नरसिंहराजू मतदारसंघाचे आमदार आणि माजी शिक्षणमंत्री तन्वीर सेठ यांच्यावर चाकूने वार करून हत्येचा प्रयत्न रविवारी रात्री झाला. याप्रकरणी मुख्य संशयितास अटक करण्यात आली आहे.
फरहान पाशा असे संशयिताचे नाव आहे. हत्येच्या उद्देशानेच सेठ यांच्यावर चाकूने वार केल्याचे त्याने कबूल केले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. याआधी काहीवेळा सेठ यांची भेट घेतली होती. नोकरी देण्याची मागणी केली होती. मदतही मागितली होती; पण दरवेळी त्यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद योग्य नव्हता. त्यांच्या वर्तणुकीमुळे असे लोकप्रतिनिधीच नको, या संतप्त भावनेतून त्यांच्यावर हल्ला केला. याआधी तीनवेळा त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचे संशयिताने सांगितल्याचे समजते.
रविवारी रात्री पावणेबाारच्या सुमारास तन्वीर सेठ आपल्या निकटवर्तीयांच्या विवाह समारंभास उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असतानाच संशयित फरहानने त्यांच्यावर चाकूने वार केला आणि तो पळून गेला. या घटनेत सेठ यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने कोलंबिया रुग्णालयात नेण्यात आले. 48 तास त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आमदारांवरील हल्ला दु:खद आहे. पोलिस अधिकार्यांकडून त्यांच्या आरोग्याबाबत चौकशी केली आहे. लवकरात लवकर ते बरे होऊ देत ही प्रार्थना.
बी. एस. येडियुराप्पा, मुख्यमंत्री