बेळगाव : प्रतिनिधी
खानापूर उपविभागाचे सहायक वनसंवर्धन अधिकारी (एसीएफ) चंद्रगौडा बी.पाटील यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकार्यांनी छापा टाकून कोट्यवधीची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली आहे. बेळगावमधील निवासस्थान, खानापुरातील कार्यालय, तसेच बैलहोंगमधील त्यांच्या भावाच्या घरावर शनिवारी पहाटे 6 च्या सुमारास छापा टाकण्यात आला.
चंद्रगौडा पाटील यांच्यावर कणबर्गी रामतीर्थनगर येथील निवासस्थानावर टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे एसीबीच्या हाती लागली आहेत. 75 लाख किमतीचे निवासस्थान, त्यांंंंच्या मालकीचा हिंंंंंंडलगा कुवेंपुनगर येथील 2400 चौरस फुटांचा प्लॉट, बंगळूर केएचबी यलेहंका येथील 53 लाख 88 हजारांचा फ्लॅट, रैनापूर यरगट्टी (ता. सौंदत्ती) येथील 13 गुंठे जागेतील 1 कोटी 50 लाख किमतीची विटा फॅक्टरी अशी एकूण 2 कोटी 35 लाखांची स्थावर मालमता असल्याचे उघडकीस आले आहे तर कार, 95 हजारांची एक व 60 हजार किमतीच्या दोन दुचाकी, 6 लाख 30 हजार रोख, 19 लाख 70 हजारांचे सोेेन्याचे दागिने, 10 लाखांचे शेअर्स, इन्शुरन्स, व बँक डिपॉझिट, 20 लाखांचे गृहोपयोगी साहित्य अशी एकूण 2 कोटी 56 लाख 80 हजार 352 रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे या छाप्यातून उघडकीस आले आहे. कारवाईदरम्यान रोख रक्कम, सोन्याचे दागिने, भावाच्या नावे असणारे जेसीबी, आदी स्थावर आणि जंगम अशी बेहिशेबी मालमत्ता एसीबीच्या अधिकार्यांनी उघडकीस आणली. कारवाईत बेळगाव गदग, धारवाडच्या अधिकार्यांनी सहभाग घेतला होता. एसीबीने पाटील यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
एसीबी पोलिसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 6 वा. छापा पडला. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. त्यामुळे भ्रष्टाचार करून बेहिशेबी मालमत्ता जमवलेल्या शासकीय अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत.
खानापुरात कार्यालयाची छाननी
येथील वनखात्याचे वनक्षेत्रपाल (एसीएफ) सी. बी. पाटील यांच्या कार्यालयावर पहाटे 6 च्या सुमारास भ्रष्टाचार नियंत्रण पथकाने (एसीबी) छापा टाकून कागदपत्रांची तपासणी केली.
शनिवारी पहाटे एसीबीचे सीपीआय आनंद व्हणकुंद्रे यांनी आपल्या अन्य तीन सहकार्यांसह सी. बी. पाटील यांच्या कार्यालयावर छापा टाकला. दरम्यान, बेळगाव येथील त्यांच्या घरावर तसेच त्यांच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांवर छापा टाकून कार्यालयातील कागदपत्रांचीही त्यांनी तपासणी केली. सी. बी. पाटील यांनी मोठ्या प्रमाणात अवैध संपत्ती जमविल्याच्या संशयावरुन एसीबीने ही कारवाई केली. मात्र, त्यांच्या कार्यालयात एसीबीच्या हाती काहीच लागले नाही. पाटील यांनी तालुक्यातील जांबोटी आणि लोंढा वनविभागात आरएफओ म्हणून सेवा बजावली आहे.