Sat, Feb 29, 2020 13:30होमपेज › Belgaon › पाच मंत्र्यांना मिळणार डच्चू ?

पाच मंत्र्यांना मिळणार डच्चू ?

Published On: May 08 2019 1:56AM | Last Updated: May 08 2019 1:56AM
बंगळूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. तीन काँग्रेस आणि दोन निजद अशा एकूण पाच मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर पाच जणांचा समावेश मंत्रिमंडळात होणार आहे.
त्याचवेळी डॉ. जी. परमेश्‍वर, डी. के. शिवकुमार, एम. बी. पाटील, के. जे. जॉर्ज या प्रभावी मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होणार आहे. विविध कारणांमुळे काँग्रेस-निजद आघाडीतील अनेक नेते नाराज आहेत. याचा फायदा उठवून भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपच्या डावाला प्रतिडाव म्हणून मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा पर्याय शोधला आहे.

निजदच्या वाट्याची दोन मंत्रिपदे रिक्‍त आहेत. शिवाय काँग्रेस नेते आणि मंत्री सी. एस. शिवळ्ळी यांच्या निधनामुळे एक पद रिक्‍त आहे. ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री कृष्णबैरेगौडा यांनी लोकसभा निवडणूक लढवली असून त्यांच्या विजयाचा विश्‍वास काँग्रेसला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात एकूण चार जागा रिक्‍त असतील, असा हिशोब आघाडीने घातला आहे.

लोकसभा निवडणुकीत येणार्‍या यश-अपयशानंतर निजदच्या दोन आणि काँग्रेसच्या तीन मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. म्हैसूर, चिक्‍कबळ्ळापूर, तुमकूर, मंड्यामधील मंत्र्यांवर संकट ओढवण्याची चिन्हे आहेत. 
अपेक्षेप्रमाणे लोकसभा निवडणूक निकाल लागला नाही तर मुख्यमंत्री बदलण्याची मागणी काँग्रेसकडून होऊ शकते. यासाठी माजी मुख्यमंत्री आणि समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या तयारी करत आहेत. पण, त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काँग्रेस आमदारांना विश्‍वासात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी त्यांनी डी. के. शिवकुमार आणि डॉ. जी. परमेश्‍वर यांच्याशी जवळीक साधली आहे.काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी के. सी. वेणूगोपाल 22 मे रोजी बंगळुरात येणार आहेत. दोन दिवस त्यांचे वास्तव्य राहणार असून या काळात ऑपरेशन भाजप कमळला प्रत्युत्तर देण्याबाबत प्रतिडाव आखण्यात येणार आहे.

भाजप आमदारांना गळ?

ऑपरेशन कमळअंतर्गत भाजपच्या गळाला लागू शकणार्‍या आमदारांना मंत्रिपद देण्यात येणार आहे. शिवाय, भाजपमधील दोन ते तीन आमदारांना आघाडीत प्रवेश देऊन त्यांनाही मंत्रिपद देण्याचा ‘मास्टरप्लॅन’ आखण्यात आला आहे.