Sat, Feb 29, 2020 18:49होमपेज › Belgaon › कुमारस्वामींना अपक्षांचे कडवे आव्हान

कुमारस्वामींना अपक्षांचे कडवे आव्हान

Published On: May 03 2018 12:15AM | Last Updated: May 02 2018 11:53PM बेळगाव : प्रतिनिधी

निजद पक्षाचा बालेकिल्ला आणि देवेगौडा परिवाराचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या रामनगर विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना घेरण्याचा प्रयत्न होत आहे. याठिकाणी भाजप-काँग्रेस उमेदवारासह नऊ अपक्ष उमेदवारांची गर्दी झाली आहे. यामुळे निजदला बालेकिल्ला शाबूत राखण्यासाठी प्रयत्नाची पराकष्ठा करावी लागणार आहे. रामनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सातत्याने माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केले आहे. 2009 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता याठिकाणी कुमारस्वामी यांनी येथून निवडणूक लढवून जिंकली आहे. यामुळे याठिकाणी त्यांचा विजय पक्‍का असल्याचे मानण्यात येते.

राज्याच्या राजकारणात या मतदारसंघाचे महत्त्व वेगळे आहे. या मतदारसंघाने राज्याला तीन मुख्यमंत्री दिले आहेत. राज्याचे पहिले मुख्यमंत्री केंगाल हनुमंतय्या यांचा हा मतदारसंघ म्हणून ओळखला जात असे. त्यानंतर  माजी पंतप्रधान व माजी मुख्यमंत्री एच. डी. देवेगौडा यांनी येथून प्रतिनिधित्व केले. हीच परंपरा कुमारस्वामी यांनी चालविली आहे. विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे निजदची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ते किंगमेकर होण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यभर प्रचारात गुंतलेल्या कुमारस्वामी यांना स्वत:च्या मतदारसंघात गुंतवून ठेवण्यासाठी नउ अपक्ष उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार म्हणून इक्बाल हुसेन एच. ए., भाजपतर्फे लीलावती निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर एस. कांतराजू, बी. एस. कुमार, गुलाब जान, भारत एन., मंजुनाथ जे.,जी. पी. शंकरेगौडा, शिवकुमार एस., सुरेंद्र रामनगर, जे. टी. प्रकाश हे अपक्ष उमेदवार आहेत.

मतदारसंघात वक्‍कलिग समाजाचे वर्चस्व आहे. हा मतदार नेहमी निजदच्या पाठीशी उभा राहत आलेला आहे. त्याखालोखाल मुसलमान समाजाची मते असून ती निर्णायक ठरतात.या मतांची विभागणी करण्यासाठी अपक्षांची गर्दी झाली आहे. यामुळे निजदच्या मतामध्ये किती प्रमाणात घट होते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. काँग्रेसने याठिकाणी मुस्लिम समाजातील उमेदवार देऊन निजदच्या मतावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला आहे. मुसलमान आणि पारंपरिक मताच्या जोरावर कुमारस्वामींना जेरीस आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत कुमारस्वामींना 83 हजार 447 मते मिळाली होती. तर काँग्रेसचे उमेदवार 58 हजार 49 मतावर समाधान मानावे लागले होते. यावेळी सत्ताधारी काँग्रेस पक्षाने केलेल्या विकासकामाच्या जोरावर मते खेचून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होणार आहे. मात्र मतदार कुमारस्वामींच्या पाठीशी थांबणार की काँग्रेसला पसंती देतात हे 12 रोजी होणार्‍या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे.