Sat, Feb 29, 2020 12:26होमपेज › Belgaon › रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची हुबळीत स्थापना

रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची हुबळीत स्थापना

Last Updated: Dec 15 2019 11:45PM
बेळगाव : प्रतिनिधी

हुबळी येथे रेल्वे भरती प्रक्रिया राबवणार्‍या रिक्रुटमेंट बोर्डाचे स्थापना करण्यात आली असून, याचे उद्घाटन 17 डिसेंबररोजी करण्यात येणार आहे. यामुळे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमधील बेरोजगारांना फायदा होणार आहे. 

रेल्वेमध्ये नोकर भरती प्रक्रिया राबविणारे बोर्ड केवळ बंगळूरमध्ये होते. त्यामुळे याचा फायदा तमिळनाडू आणि केरळच्या विद्यार्थ्यांना अधिक होत होता.  कर्नाटक आणि महाराष्ट्राला याचा फायदा होत नव्हता.  त्याच ठिकाणी स्थानिक परिसरात नोकरभरतीच्या जाहिराती प्रसिध्द होत होत्या. भरती प्रक्रिया आणि परीक्षा बंगळूरमध्येच राबवली जात असल्यामुळे अधिक फायदा तमिळनाडू, केरळचे विद्यार्थी, बेरोजगार घेत होते. 

आता बंगळूरबरोबरच हुबळीमध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची स्थापना करण्यात येत आहे. येथील भरती प्रक्रियेसाठी हे बोर्ड कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये जनजागृती मोहीम राबवणार आहे. याचा फायदा बेळगाव, हुबळी धारवाड, विजापूर, बागलकोट महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे भरतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना होणार आहे. 

याचे कार्यालयाचे उद्घाटन हुबळी येथील रेल्वेच्या जुने सरव्यवस्थापक कार्यालयाच्या इमारतीमध्ये 17 डिसेंबररोजी दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, उद्योग आणि बेळगावचे पालकमंत्री जगदीश शेट्टर आदी उपस्थित राहणार आहेत.

रेल्वे भरतीमध्ये उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील लोकांना प्राधान्य मिळावे यासाठी हुबळीला रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाचे स्थापना करण्यात येत आहे. याची जनजागृतीही करण्यात येईल. रेल्वे भरतीसाठी आता स्थानिकांना वाव मिळणार आहे. 
- सुरेश अंगडी, रेल्वे राज्यमंत्री