Sat, Feb 29, 2020 17:32होमपेज › Belgaon › खानापुरात विजेच्या धक्क्याने महिला ठार

खानापुरात विजेच्या धक्क्याने महिला ठार

Published On: Aug 29 2019 9:05AM | Last Updated: Aug 28 2019 11:46PM
खानापूर : प्रतिनिधी

शेतात तुटलेल्या विद्युत भारित तारेला स्पर्श झाल्याने एक महिला जागीच ठार झाली. यावेळी महिलेसोबत असलेल्या कुत्र्याने तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, या दुर्घटनेत या इमानी कुत्र्याचाही मृत्यू झाला. 

खानापूर असोगा मार्गावरील रेल्वेस्थानकासमोरील शेतवडीत हा प्रकार घडला. शांताबाई मारुती घाडी (वय 50, रा. रुमेवाडी, ता. खानापूर) असे या मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी सकाळी शांताबाई एकट्याच शेतात भांगलणीच्या कामासाठी गेल्या होत्या. सायंकाळी सात वाजता घरी परतणार्‍या शांताबाई रात्र झाली तरी घरी आल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. रुमेवाडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेताकडे धाव घेऊन पाहिले असता शेतातच आई व कुत्रा दोघेही मृत झाल्याचे शांताबाईंच्या मुलांच्या निदर्शनास आले. रात्री उशीर झाल्याने याबाबत बुधवारी सकाळी पोलिस व हेस्कॉमला माहिती देण्यात आली. दोन्ही विभागांच्या अधिकार्‍यांनी सकाळी सात वाजता घटनास्थळी भेट दिली. 

मयत शांताबाई यांचे पती पंधरा वर्षांपूर्वी घरातून निघून गेले आहेत. त्यांची दोन्ही मुले अविवाहित असून आईच्या जाण्याने ती पोरकी झाली आहेत. या महिलेच्या एका मुलाला हेस्कॉम विभागाने नोकरी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हेस्कॉमच्यावतीने पाच लाखाची नुकसान भरपाई देण्याची ग्वाही अधिकार्‍यांनी दिली. तहसीलदार शिवानंद उळागड्डी यांनी सात दिवसात भरपाई देण्याची सूचना केली. अंत्यविधीसाठी हेस्कॉमकडून दहा हजाराची तातडीची मदत शांताबाई यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक मोतीलाल पवार, उपनिरीक्षक बसवनगौडा पाटील यांनी घटनेचा पंचनामा केला.

अपघातानंतर हेस्कॉम जागे 

या प्रकाराला सर्वस्वी हेस्कॉमचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास बाजूच्या काही शेतकर्‍यांना तुटलेली तार निदर्शनास येताच दुरुस्तीसाठी हेस्कॉमला कळविले होते. मात्र सायंकाळपर्यंत त्या ठिकाणी एकही कर्मचारी दाखल झाला नव्हता. अपघाताची कल्पना आल्यानंतर रात्री साडेसात वाजता येथील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी करुन खातरजमा करता आली. या परिसरातील शिवारामध्ये अनेक ठिकाणी विद्युत तारा लोंबकळत असल्याने त्यांची तातडीची दुरुस्ती करण्याची गरज आहे. काही ठिकाणी तर सहा ते सात फूट अंतरावर विद्युत वाहिन्या आल्या आहेत. 

मूक जनावराची बोलकी माया

अपघातात मालकिणीसोबत मृत्युमुखी पडलेला कुत्रा शेताकडे जाताना नेहमी शांताबाई यांची सोबत करत होता. एकंदर परिस्थितीवरून दुर्घटना घडली त्यावेळी कुत्र्याने वीज तारेमध्ये अडकलेल्या आपल्या अन्नदात्री मालकिणीची सुटका करण्यासाठी तोंडात तार घेऊन ती दूर ओढण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचे दिसून आले; मात्र त्याच तारेच्या झटक्याने कुत्राही जागीच गतप्राण झाला. यावेळी तार कुत्र्याच्या तोंडातच होती. मालकिणीला वाचविण्यासाठी धडपडलेल्या मूक जनावराच्या मृत्यूमुळे उपस्थितातून हळहळ व्यक्‍त करण्यात येत होती.