Fri, Nov 27, 2020 10:44पोलिस भरतीला पुन्हा डमी उमेदवार

Last Updated: Nov 23 2020 2:05AM
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

राज्य राखीव दलातील पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी रविवारी सीईटी झाली. यावेळी  मूळ उमेदवाराऐवजी डमी उमेदवार परीक्षा देत असल्याचे आढळून आले. अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर उद्यमबाग, माळमारुती, टिळकवाडी व शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात झालेल्या परीक्षेला डमी उमेदवार बसल्याचे आढळून आले होते.

उद्यमबाग ठाण्यात भीमशी महादेव हुल्लोळी (24, रा. हडगीनाळ, ता. गोकाक), टिळकवाडीत सुरेश लक्ष्मण कडवी (25, रा. बेनचीनमर्डी, ता. गोकाक), शहापूरला आनंद हनुमंत वडेयर (28, उदगट्टी, ता. गोकाक) व माळमारुती पोलिस ठाण्यात महबूब बाबासाब अक्कीवाटे (23, उदगट्टी, ता. गोकाक) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

शहरातील 39 परीक्षा केंद्रांवर रविवारी कॉन्स्टेबल हुद्द्यासाठी आवश्यक सीईटी झाली. 11 हजार 921 पैकी 8 हजार 461 उमेदवार परीक्षेला बसले होते. परीक्षेसाठी त्या-त्या भागासह जिल्ह्यातील निरीक्षक व उपनिरीक्षक  पर्यवेक्षक म्हणून काम पाहतात. सकाळी 11 ते 12.30 या काळात झालेल्या सीईटीला चार ठिकाणी मूळ उमेदवार वगळता त्यांच्या जागी डमी उमेदवार परीक्षा देत असल्याचे आढळून आले. यामध्ये जीआयटी कॉलेज उद्यमबाग, लव्ह डेल सेंट्रल स्कूल, माळमारुती, केएलएस इंग्रजी माध्यम हायस्कूल, टिळकवाडी व सरकारी चिंतामणराव पदवीपूर्व कॉलेज, शहापूर या ठिकाणी हे डमी परीक्षा देत होते. त्यांना पकडून त्यांच्यावर त्या-त्या परिसरातील ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी डॉ. विक्रम आमटे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.