Mon, Jan 18, 2021 15:20होमपेज › Belgaon › उत्पादन घटले तरीही दर वाढेना !

उत्पादन घटले तरीही दर वाढेना !

Last Updated: Nov 18 2019 11:25PM
खानापूर : वासुदेव चौगुले

चार महिन्यांपूर्वी दोन हजारच्या घरात गेलेले इंटाण, इंद्रायणी जातीच्या भाताचे दर ऐन सुगीच्या हंगामात मोठ्या फरकाने खाली घसरल्याने शेतकर्‍यांना चांगल्या दरासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. तांदळाव्यतिरिक्त अन्य उत्पादनांसाठी ज्या बाजारपेठांना भाताची गरज असते. तेथून मागणी घटल्याने दर पडले आहेत. अतिवृष्टीमुळे यंदा उत्पादनात मोठी घट झालेली असताना आता दराचा फटकाही शेतकर्‍यांना सहन करावा लागणार आहे.

खानापूर तालुक्यात जवळपास 32 हजार हेक्टर जमिनीत भातपीक घेतले जाते. जिल्ह्यात सर्वाधिक भाताचे उत्पादन घेणारा तालुका म्हणून खानापूर तालुक्याची ओळख आहे. तालुक्यातील सुग्रास भाताला हुबळी-धारवाड, मंगळूर, सेलम, तामिळनाडू,  कारवार, बेळगाव आदी ठिकाणी मोठी मागणी आहे. तांदूळ उत्पादनाबरोबरच चुरमुरे, इडलीचा रवा, बियर आणि पोह्यांच्या निर्मितीसाठीही भाताची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येते.

यावर्षी उत्पादन घटल्याने समाधानकारक दर मिळेल असा शेतकर्‍यांचा अंदाज होता. सुगीत भात विकून आपली आर्थिक गरज भागविण्याचा बळीराजाचा खटाटोप सुरु असतो. नोव्हेंबरपासून भात व्यापार्‍यांच्या खरेदीला तेजी आलेली दिसून येते. मात्र खानापूर शहर व परिसरातील भात व्यापारी शेतकर्‍यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन अतिशय कमी दराने भाताची खरेदी करत असल्याचे प्रकार घडत आहेत.भात खरेदीदारांच्या म्हणण्यानुसार चुरमुरे तयार करण्यासाठी भाताला मोठी मागणी असते. मात्र बेळगाव व हुबळी येथील बाजारपेठांमध्ये परराज्यातून चुरमुर्‍यांची आवक होत असल्याने स्थानिक भाताची मागणी रोडावली आहे. परिणामी जादा दर देणे न परवडणारे आहे. सध्या जुन्या भाताला 1700 ते 1800 रू. आणि नव्या भाताला 1600 रु. दर आहे. हाच दर जुलै महिन्यात दोन हजारच्या वर गेला होता. त्यामुळे चांगला दर मिळण्यासाठी शेतकर्‍यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

सरकारने भाताला हमीभाव द्यावा

वास्तविक बाजारपेठेतील भाताचे दर पडल्यानंतर यापूर्वी शासनाने हमीभाव जाहीर करुन शेतकर्‍यांकडून भातखरेदी करुन दिलासा दिला होता. यंदा मात्र उत्पादन कमी होऊनही समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकर्‍यांना तोटा सहन करावा लागत आहे. खानापूर तालुक्यात 200 पेक्षा जास्त लोक भाताचा व्यापार करतात. नंदगड गाव तर भाताच्या खरेदीचे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील महत्वाचे केंद्र होते. 

ही लूट थांबवा

नव्या इंटाण भाताचा दर प्रति क्विंटलला शंभर रु. कमी आकारण्यात येत आहे. हा दर देताना शेतकर्‍याला प्रत्येक भाताच्या पोत्यामागे दोन किलो सूट वजा करुन रक्कम देण्यात येत आहे. प्लास्टीक पोत्यातून विक्री केल्यास पूर्ण वजनाचे पैसे दिले जात आहेत. मात्र सुतळी गोणपाटाच्या पोत्यातून भात विक्रीसाठी नेल्यास एकून वजनातून पोत्याला 2 किलो कमी रक्कम अदा केली जाते. वास्तविकपणे खानापुरातील भातव्यापार्‍यांनी स्वतःच हा नियम तयार केला आहे. 

यासाठी आहे खानापूरच्या भातपिकाला मागणी !

खानापूर तालुक्यात दोडगा, मटाळगा आणि इंटाण या जातीचे पीक मोठ्याप्रमाणात घेण्यात येते. त्यापैकी मटाळगा भाताच्या तांदळापासून इडलीसाठी लागणारा उत्तमप्रतीचा रवा बनविला जातो. बिअरच्या निर्मितीसाठीही याच तांदळाचा वापर केला जातो. त्यामुळे विशेषकरुन दक्षिणेतील तामिळनाडू, सेलम, मंगळूर याठिकाणी खानापुरातील भाताची मोठी निर्यात केली जाते. अलिकडच्या काळात भाताच्या पॉलिश कोंड्यापासून खाद्यतेलाचीही निर्मिती करण्यात येत आहे. तसेच चांगल्याप्रतीच्या पोह्यांसाठीही खानापूरचे भात प्रसिद्ध आहे.

भाताचे दर असे !

इंटाण - 1700 रु. प्रति क्विंटल
मटाळगा, दोडगा - 1650 ते 1700 रु. प्रति क्विंटल
इंद्रायणी - 1900 ते 2000 रु. प्रति क्विंटल
अभिलाषा - 1550 ते 1600 रु. प्रति क्विंटल