Wed, Sep 23, 2020 22:18होमपेज › Belgaon › स्मार्ट बेळगावमध्ये घशाला कोरड

स्मार्ट बेळगावमध्ये घशाला कोरड

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 14 2018 1:43AMबेळगाव : प्रतिनिधी

ऐन उन्हाळ्यामध्ये बेळगाव शहराला पाच दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे तीव्र टंचाईला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. शहराच्या घशाला कोरड पडली आहे. कर्नाटक शहर पाणीपुरवठा मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून शहराला दररोज 24 एमजीडी पाणी औद्योगिक वसाहतीसह पुरवठा केला जातो, असे सांगण्यात येते. परंतु पाच दिवसातून एकदा पुरवठा केला जात असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.

रोजच्या घरगुती वापराकरिता, कपडे धुण्याकरिता, स्वच्छतागृह,  आदींसाठी पाणी कोठून आणायचे, हा प्रश्‍न नागरिकांना भेडसावत आहे. मनपाने शहरातील काही खुल्या विहिरीवर लघु जलशुध्दीकरण प्रकल्प राबविले आहेत. तेथे पाच दिवसात एकदा-दोनदा पाणी सोडण्यात येत असल्याने तेथील नागरिकांना तितकी टंचाई भासत नाही. परंतु लघु जलशुध्दीकरण प्रकल्प किंवा कूपनलिकांवर टाक्या बसवून पाण्याची व्यवस्था केलेली नाही, तेथील नागरिकांना रोजच्या वापरासाठी पाणी कोठून आणावयाचे, हा प्रश्‍न भेडसावत आहे.
 

गळत्या रोखा
शहरामध्ये काही ठिकाणी जलवाहिन्यांना गळत्या लागल्याने तेथून रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.  गळत्या दुरुस्त करण्यासाठी पाणी मंडळाकडे तक्रार 
केली तरी  दुरुस्तीकडे मंडळाच्या अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. माळमारुती सेक्टर नं. 12 मध्ये एक जलवाहिनी फुटल्यामुळे तेथून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्याच्या दुरुस्तीकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्षच केल्याचा आरोप नागरिक करतात. माळमारुती विभागात नेहमीच पाण्याची तीव्र टंचाई भासते. बसवनकोळ येथे मनपा व पाणी मंडळाने जलशुध्दीकरण प्रकल्प राबविल्यामुळे माळमारुती विभागातील नागरिकांना तितकी टंचाई नाही. परंतु पाच दिवसातून एकदा पुरवठा सुरू आहे.

मनपा सत्ताधारी गटनेते पंढरी परब म्हणाले, शहरातील 63 कूपनलिकांवर सिंथेटिक टाक्या बसविण्याची मागणी नगरसेवकांनी पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकार्‍यांकडे बैठकीद्वारे केली होती. त्यानुसार शहरात बहुतांश भागात टाक्या बसविण्याचे किंवा थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पाणी टंचाईवर थोड्या प्रमाणात का होईना मात करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी कूपनलिका नसतील, टाक्या नसतील त्या भागातील नागरिकांची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मनपा आयुक्‍त व कर्नाटक शहर पाणी पुरवठा मंडळाचे कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. 

Tags :Dry drying , Belgaon,, belgaon news