Sun, Sep 20, 2020 03:36होमपेज › Belgaon › बेळगावशी संबंधित पोलिस अधिकारी सीबीआयच्या रडारवर

बेळगावशी संबंधित पोलिस अधिकारी सीबीआयच्या रडारवर

Last Updated: Sep 17 2020 2:12AM
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा 

धारवाडचे जि.प. सदस्य योगीशगौडा खून प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागणार असून, त्यांचे भाऊ विजय कुलकर्णी यांची बुधवारी बंगळुरात सीबीआयकडून चौकशी झाली. या प्रकरणात बेळगावशी संबंध असलेला एक सीपीआय दर्जाचा अधिकारीही सीबीआयच्या रडारवर असून, त्याचीही चौकशी होणार आहे. तसे झाल्यास त्याला अटकही होऊ शकते. बेळगाव पोलिस आयुक्तालयाच्या व्याप्तीत सेवा बजावलेल्या सीपीआयला ही हे प्रकरण शेकणार असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे. 

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून माजी मंत्री विनय कुलकर्णी व त्यांचे बंधू विजय कुलकर्णी यांना सीबीआयने बंगळूर कार्यालयाला येण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार विजय कुलकर्णी सीबीआय कार्यालयात हजर झाले. योगीशगौड खून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न काही पोलिस अधिकार्‍यांनी केल्याचे तपासातून पुढे आले आहे. सीबीआयने केलेल्या चौकशीत सदर खून सुपारी घेऊन करण्यात आल्याचे समोर येत आहे.  प्रकरण दाबण्याचा प्रयत्न स्थानिक पोलिस अधिकार्‍यांनीही केल्याचे सांगण्यात येत आहे. 

तपासात मुख्य तपास अधिकारी म्हणून भूमिका बजावलेल्या सदर पोलिस अधिकार्‍याने बेळगावमध्ये  काही काळ सेवा बजावली होती; पण त्याने तपास व्यवस्थित न केल्यानेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. त्या अधिकार्‍याला अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  सीबीआयचे एक पथक बंगळुरातच असून, ते या प्रकरणाशी संबंधित सर्व संशयितांची चौकशी करीत आहे.

योगीशगौडा कोण?

योगीशगौडा हा भाजपचा धारवाड जिल्हा पंचायत सदस्य होता. 15 जून 2016 रोजी रात्री 8 च्या सुमारास  सप्तपुरा नगरातील जिमसमोर कोयत्याने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला होता. एका टोळक्याने हा हल्ला केला होता. काँग्रेस आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या वादात हा सुपारी खून झाल्याची चर्चा होती.  स्थानिक पोलिसांनी तीन वर्षे तपास चालवला; पण तो समाधानकारक नसल्याचे भाजपचे म्हणणे होते. त्यामुळे ऑगस्ट 2019 मध्ये कर्नाटकात पुन्हा भाजप सरकार सत्तेवर येताच 24 सप्टेंबर 2019 रोजी या खुनाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली. 

 "