Sun, Mar 29, 2020 00:24होमपेज › Belgaon › ग्रामसभांतून व्हावी दुष्काळ निवारणावर चर्चा

ग्रामसभांतून व्हावी दुष्काळ निवारणावर चर्चा

Published On: Jun 06 2019 1:34AM | Last Updated: Jun 05 2019 11:29PM
निपाणी : विठ्ठल नाईक

यंदा उष्म्याने गाठलेला चाळिशीवर पारा.... पावसाने मारलेली दडी.... शेतीसह पिण्याच्या पाण्याची समस्या.... आणि ऐन दुष्काळाच्या वेळेत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता.... या सर्वांमुळे गावागावात समस्या उभ्या ठेपल्या आहेत. ग्रामसभांतून समस्यांवर तोडगा काढण्यात सभाही झाल्या नाहीत. आता निवडणूक संपल्याने ग्रामपंचायतीतर्फे घेण्यात येणार्‍या ग्रामसभांना सुरुवात होत असून ग्रामसभांतून दुष्काळ निवारणावर अधिक चर्चा व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

चिकोडी, निपाणी, रायबाग, अथणी, कुडची, कागवाड तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे अनेक गावांमध्ये प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून खासगी टँकरने विकतचे पाणी  घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कृष्णा काठ तर गेल्या तीन महिन्यापासून कोरडा असून नागरिक मैलोन् मैल पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. त्यामुळे आता प्रत्येक ग्रामपंचायतीने दुष्काळ निवारणावर बैठकांमध्ये ठराव करुन ता. पं. व जि. पं. च्या माध्यमातून प्रयत्न करणे अत्यावश्यक बनले आहे.

सीमाभागातील गावांसाठी दूधगंगा व वेदगंगा नदी वरदान ठरली आहे. पण काळम्मावाडी करारानुसार  ठराविक दिवसांनी नदीमध्ये पाणी सोडण्यात येते. यंदा आंदोलने, निवेदने देऊनही कोयनेतून कृष्णा नदीत पाणी न आल्याने नागरिक प्रशासनाच्या नावाने ओरडत आहेत. स्थानिक ग्रामपातळीवर ग्रामसभांतून  पिण्याच्या पाण्याची समस्या निवारणासाठी ठोस नियोजन महत्त्वाचे आहे. कूपनलिका व विहिरीतील पाण्याचे योग्यरित्या नियोजन करीत संपूर्ण वॉर्डांना किमान पाणीपुरवठ्याची मागणी होत आहे.

ग्रामसभांतून होणारे ठराव केवळ कागदोपत्री न राहता अंमलबजावणी होण्यासाठी निर्णय महत्त्वाचे आहेत. शासनाकडून मिळणारा रोहयो अंतर्गत निधी, जि. पं., ता. पं. च्या माध्यमातून मिळणार्‍या निधीतून नागरिकांच्या जिवंत समस्या सोडविण्यासाठी भर दिल्यास मूलभूत समस्या सुटू शकतील. सध्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून सध्या बैठकांतून त्यावर तोडग्यासाठी चर्चा होण्याची गरज आहे.

यंदा वळीव पावसानेही दडी मारल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीपिकांचे भवितव्यही कठीण बनले आहे. शेतकरीवर्ग पावसाच्या प्रतिक्षेत असून पिके करपू लागली आहेत. त्यातच पिण्याच्या पाण्याची  अनेक गावात गंभीर समस्या निर्माण झाल्याने ग्रा. पं. बैठकांतून समस्या निवारणाबाबत ठोस निर्णय   व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्‍त होत आहे.

आचारसंहितेच्या काळात ग्रामसभा झालेल्या नाहीत. आता प्रत्येक महिन्याला ग्रामपंचायतीच्या बैठका होतील. ग्रामपातळीवर नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यावर बैठकीत ठराव घालून विकासकामांना चालना देण्यात येते. जि. पं., ता. पं. च्या माध्यमातून ग्रामपंचायतीला निधी मिळतो. दुष्काळ निवारणाबाबत ग्रामसभांतून चर्चा होणार आहे.- प्रशांत पाटील, तहसीलदार, निपाणी

ग्रामसभांतून दुष्काळ निवारणाबाबत चर्चा होणार आहे. गळतगा ग्रा. पं. ची बैठक 7 रोजी होत असून पिण्याच्या पाणी नियोजनाचा विषय चर्चेसाठी घेतला आहे. गळतगासह ग्रा. पं. अख्त्यारित येणार्‍या गावातील पाणीसमस्या निवारणासाठी प्रयत्न सुरु आहेत. ग्रा. पं. बैठकीत याबाबत सखोर चर्चा करुन समस्या निवारणासाठी प्रयत्न करणार आहे.-श्रीकांत बन्‍ने, ग्रा. पं. अध्यक्ष, गळतगा