होमपेज › Belgaon › कोल्हापूरच्या धर्तीवर विकास करणार

कोल्हापूरच्या धर्तीवर विकास करणार

Published On: Mar 08 2018 12:00AM | Last Updated: Mar 07 2018 11:26PMनिपाणी:प्रतिनिधी 

निपाणी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस कटिबध्द आहे. कोल्हापूर शहराच्या धर्तीवर निपाणी नव्या तालुक्याचा विकास साधणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले. येथे  तहसील कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

रमेश जारकीहोळी पुढे म्हणाले, निपाणी तालुक्यातून परिसराचा सर्वांगीण विकास करून संपूर्ण मतदारसंघाचा चेहरामोहरा  बदलण्यात येईल. नव्या तालुक्यासाठी तातडीने कार्यालये सुरु करण्यात येतील. माजी आमदार कै. रघुनाथराव कदम (दादा) यांनी 1972 साली  निपाणी तालुक्याची मागणी केली होती. त्यांचे शिष्य  माजी आ. काकासाहेब पाटील यांनी या मागणीचा पाठपुरावा केल्याने निपाणी तालुक्याची निर्मिती झाली आहे. निपाणी शहराचा विकास करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध केला जाईल. आवश्यक असणारी सर्व कार्यालये टप्प्याटप्प्याने सुरू होतील.

नूतन तहसीलदार संजीव कांबळे यांनी स्वागत केले. पालकमंत्री जारकीहोळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर चिकोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी, माजी आ. सुभाष जोशी, काकासाहेब पाटील, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, उपनगराध्यक्ष सुनील पाटील, सभापती नितीन साळुंखे, युवानेते उत्तम पाटील, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, अशोकुमार असोदे उपस्थित होते.
तहसीलदार चिंदबर कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात याठिकाणी 10 कार्यालये कार्यान्वित असून अद्याप 14 कार्यालयांची गरज आहे. त्यामध्ये ता. पं., जि. पं., सार्वजनिक बांधकाम विभाग अशी कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. 53 खेड्यांचा समावेश असून 34 ग्रामपंचायतीचा सहभाग या तालुक्यात आहे. या तालुक्याची लोकसंख्या 3 लाख 10 हजार आहे. येथे विधानसौध इमारतीसाठी नगरपालिकेने 2 एकर  जागा हस्तांतरित केली आहे. त्यानुसार कामाला लवकरच प्रारंभ होणार असल्याचे सांगितले.

प्रातांधिकारी गिता कौलगी म्हणाल्या,  या  कार्यालयात सध्या 5 अधिकार्‍यांची नियुक्ती झाली आहे.टप्प्याटप्प्याने आवश्यक असलेल्या  17 जागा मंजूर जागावर कर्मचार्‍यांची नियुक्ती होणार आहे. आगामी निवडणुकीनंतर सर्व अधिकारी व कार्यालये पूर्णवेळेप्रमाणे सुरू होतील.कार्यक्रमास उपतहसीलदार एन. बी. गेज्जी, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, निकू पाटील, सभापती नितीन सांळुखे, नगरसेवक राजेंद्र चव्हाण, दिलीप पठाडे,  मुन्ना काझी, अनिस मुल्‍ला, रवींद्र चंद्रकुडे, निता लाटकर, संदीप चावरेकर, धनाजी निर्मळे, अरूण भोसले, नम्रता कमते, माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी, मोहन बुडके  यांच्यासह मान्यवर, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.