Tue, Jul 07, 2020 19:22होमपेज › Belgaon › बेळगाव-गोवा महामार्गावरील वृक्षतोडीस स्थगिती

बेळगाव-गोवा महामार्गावरील वृक्षतोडीस स्थगिती

Last Updated: Oct 19 2019 1:26AM
खानापूर : प्रतिनिधी

मुंबईतील आरे वृक्षतोड प्रकरणासारखी पुनरावृत्ती खानापूर-जोयडा तालुक्यातील जंगलाच्या बाबतीत घडली आहे. लोंढा वनविभागातून  जाणार्‍या बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात आणखी वृक्षतोड करण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश बजावला आहे. 

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गुरुवारी याबाबतचा आदेश बजावला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दि. 31 ऑक्टोबरच्या आत वृक्षतोडीचा सविस्तर अहवाल मागितला आहे.

बेळगाव-पणजी महामार्गाच्या विकासासाठी खानापूर आणि लोंढा विभागातील 22 हजार वृक्षांवर कुर्‍हाड उगारण्यात आली आहे. त्याविरोधात अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सुरेश हेबळीकर व जोसेफ हुवेर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. 

दांडेली वन्यजीव अभयारण्याच्या सीमेलगत वसलेल्या लोंढा, खानापूर जंगलातील वृक्षसंपदेवर महामार्ग रुंदीकरणाच्या नावाखाली कुर्‍हाड उगारून पर्यावरणाची अपरिमित हानी केल्याचे याचिकेत म्हटले आहे. 

महामार्ग रुंदीकरणासाठी आजपर्यंत 12 हजार 258 झाडे तोडली असल्याची माहिती खुद्द प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी न्यायालयासमोर मांडली. ही आकडेवारी ऐकून खंडपीठाला धक्‍का बसला. याबाबत वनविभागाकडून परवानगी न घेता इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केल्याबद्दल न्यायालयाने महामार्ग प्राधिकरणाला फटकारले आहे. शिवाय 28 फेब्रुवारी ते आजतागायत महामार्ग रुंदीकरणासाठी किती झाडे तोडली, याबाबतचा सविस्तर अहवाल 31 ऑक्टोबरपूर्वी सादर करण्याचे आदेश महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत.

स्थगिती 16 कि. मी अंतरासाठी!

महामार्ग प्राधिकरणाला चौपदरीकरणाच्या कामासाठी खानापूर तालुक्याच्या हद्दीतील वृक्षतोडीसाठी केंद्रीय वनविभागाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे वृक्षतोडीचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. अनमोड, तिनईघाट परिसरातील जंगलाचा समावेश काळी व्याघ्र प्रकल्पात होतो. तसेच येथून कॅसलरॉक वन्यजीव संरक्षित विभाग जवळ आहे. त्यामुळे या भागातील वृक्षतोडीस वनविभागाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे या भागातील 16 कि. मी अंतरावरील वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आली आहे.