Mon, Nov 30, 2020 13:43बेळगाव : खासबागात जमावाची दगडफेक 

Last Updated: Nov 29 2020 1:07AM
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

दोन दुचाकीवरून निघालेल्या चार तरुणांच्या गटात वादावादी होऊन रविवारी सायंकाळी खासबागमध्ये दगडफेक झाली. त्यात एक युवक जखमी झाला असून, परिसरात तणाव निर्माण झाला होता. खासबाग येथील जयवंती मंगल कार्यालयाजवळ हा प्रकार घडला. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शांतता प्रस्थापित केली. त्यानंतर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वास्तुशांतीसाठी गर्दी झालेल्या एका घराजवळ दोन तरुणांच्या गटांत वाद उफाळून आला. एका तरुणाने दुसर्‍याला मारहाण केली. मारहाण करून दुचाकीवरून पलायन करणार्‍या तरुणांवर जमावाने दगडफेक केली. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून दोघा तरुणांनी दुसर्‍या दुचाकीवरून निघालेल्या दोन तरुणांना बांगड्या दाखवल्या. आधी जुन्या पीबी रोडवरील साई हॉलजवळ हा प्रकार घडला. यामुळे चिडलेल्या तरुणांनी बांगड्या दाखवणार्‍या दोघांचा पाठलाग केला आणि त्यांना जुन्या पीबी रोडवरील जयवंती मंगल कार्यालयाजवळ गाठले व तेथे अरजान बेपारी या तरुणाला मारहाण सुरू केली. जवळच एक प्रार्थनास्थळ असून, त्याच्या बाजूला एका घराची वास्तुशांती सुरू होती. या गर्दीच्या ठिकाणीच अरजानला मारहाण झाली. 

वास्तुशांतीसाठी जमलेल्या लोकांनी तरुणांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु, मारणारे अधिकच आक्रमक झाल्याने त्यांच्यावर जमावाने दगडफेकीला सुरुवात केली. त्यानंतर मारहाण करणारे दोघेजण पळून गेले. परंतु, मोठा जमाव  व अशातच दगडफेक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती मिळताच मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमणी, शहापूरचे निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. 

कोणी मारले गुलदस्त्यात 

मारहाणीचा वाद हा त्या चौघा तरुणांमध्येच घडला. परंतु, जमावाने दगडफेक केल्याने त्याला वेगळे वळण लागले. जखमी झालेल्या अरजानला पोलिसांनी मारणार्‍यांची नावे विचारली, पण त्याने कोणाचेही नाव सांगितले नाही.  चार तरुणांमध्ये जुना वाद असून जखमी तरुण काहीच बोलायला तयार नाहीत. त्यामुळे या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झाला नसल्याचे निरीक्षक राघवेंद्र यांनी सांगितले.