Sat, Feb 29, 2020 18:29होमपेज › Belgaon › बेळगाव शहरावर हक्क सांगण्यासाठीच अधिवेशन

बेळगाव शहरावर हक्क सांगण्यासाठीच अधिवेशन

Published On: Dec 21 2018 1:21AM | Last Updated: Dec 20 2018 11:08PM
बेळगाव : प्रतिनिधी

भाजप-निजद युती सरकार असतानाच सर्वप्रथम आम्ही बेळगावात अधिवेशन घेतले. त्यावेळी अधिवेशनासाठी सुसज्ज इमारत नव्हती. त्याच वेळी बेळगाववर हक्क सांगण्यासाठी सुवर्णसौध बांधण्याचा निर्णय घेतला, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला.

उत्तर कर्नाटकावर चर्चा करण्याची मागणी करून भाजप आमदारांनी विधान परिषदेत हट्ट धरल्यानंतर त्यांना उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार बेळगाववर हक्क सांगत असून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बेळगावला कर्नाटकातून तोडण्याचा प्रयत्न होत आहे. अशा परिस्थितीत बेळगावात प्रथमच अधिवेशन भरविले ते आपल्या नेतृत्वाखालील भाजप-निजद युती सरकारने. उत्तर कर्नाटकच्या समस्यांची जाणीव मला आहे. केएलई संस्थेच्या इमारतीत अधिवेशन भरविले. त्याचवेळी सुसज्जित सुवर्णसौध निर्माणाचा निर्णय घेतला. वर्षातून एकदा हिवाळी अधिवेशनाचा निर्णय घेतला. राज्याचे दोन तुकडे करण्यासाठी ही इमारत बांधलेली नाही. त्यामुळे उत्तर कर्नाटकवर चर्चा करण्यास कोणतीच हरकत नाही. सभापतींच्या आदेशानुसार प्रश्‍नोत्तरानंतर त्यावर चर्चा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कर्जमाफीसाठी पाटबंधारे योजना स्थगित केल्याचा आरोप आहे, शिवाय अनेक विषयांवर चर्चेची गरज आहे. त्यामुळे आमदारांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.