Sat, Feb 29, 2020 13:25होमपेज › Belgaon › प्रकाश हुक्केरींच्या बालेकिल्ल्यात भाजपची कसोटी 

प्रकाश हुक्केरींच्या बालेकिल्ल्यात भाजपची कसोटी 

Published On: Apr 10 2018 1:16AM | Last Updated: Apr 10 2018 1:16AM
बेळगाव: प्रतिनिधी

राज्यातील राजकारणात बडी हस्ती म्हणून ओळखल्या जाणार्‍या  खा. प्रकाश हुक्केरी यांचा मतदारसंघ म्हणून चिकोडी-सदलगा मतदारसंघ ओळखण्यात येतो. हुक्केरी पितापुत्रांना घेरण्यासाठी भाजपने यावेळी व्यूहरचना केली आहे. आ. गणेश हुक्केरी यांना राज्याच्या राजकारणात आणण्यासाठी खा. हुक्केरी यांनी लोकसभेत जाणे पसंत केले. यावेळी भाजपकडून अण्णासाहेब जोल्ले यांना रिंगणात उतरविण्यात येणार आहे. परिणामी मतदारसंघात काँटे की टक्‍कर पहावयास मिळणार आहे.

या मतदारसंघाने सातत्याने काँग्रेसला साथ दिली आहे. या मतदारसंघातूनच खा. प्रकाश हुक्केरी यांनी राजकारणात आपला दबदबा निर्माण केला. मतदारांशी थेट संवाद साधणारी रांगडी पद्धत, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सतत होणारे प्रयत्न, यामुळे त्यांनी मतदारांच्या मनात आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. यामुळे आजवर कोणत्याही पक्षाला प्रयत्न करूनदेखील काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणे शक्य झालेले नाही. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व खा. हुक्केरी यांचे पुत्र आ. गणेश हुक्केरी करत आहेत.यापूर्वी ते दोनदा जिल्हा पंचायतमध्ये निवडून आले होते. त्यानंतर प्रकाश हुक्केरी यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळविल्यामुळे गणेश हुक्केरी यांनी विधानसभा निवडणुकीत उडी घेतली. त्यावेळी त्यांनी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्याशी टक्‍कर दिली.

हुक्केरी पिता-पुत्रांना टक्‍कर देण्यासाठी भाजपने अनेक प्रयोग केले. वेगवेगळ्या उमेदवारांना निवडणुकीत उतरविले. परंतु, अद्याप भाजपच्या पदरात यशाचे माप पडलेले नाही. ही खंत भाजपला सतावत आहे. मात्र, 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अण्णासाहेब जोल्ले यांना प्रकाश हुक्केरी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. यावेळी सहकारनेते अण्णासाहेब जोल्ले यांना भाजपकडून विधानसभेच्या आखाड्यात उतरविण्यात येणार आहे. जोल्ले यांनी सहकाराच्या माध्यमातून अनेक प्रकल्प राबविले आहेत. अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यामुळे त्यांचा वैयक्‍तिक संपर्क पक्षाच्या हितासाठी वापरण्यात येणार आहे. परिणामी आ. गणेश हुक्केरी व अण्णासाहेब जोल्ले अशी थेट लढत रंगण्याची शक्यता आहे.

जोल्ले यांची उमेदवारी जाहीर झाल्यास हुक्केरी यांना विजयासाठी अधिक घाम गाळावा लागणार आहे.  भाजपला या मतदारसंघात विजय आवश्यक असून त्यांच्याकडून याठिकाणी पद्धतशीर प्रयत्न करण्यात येत आहे. मतदारसंघात काँग्रेस, भाजप व्यतिरिक्‍त अन्य राजकीय पक्षांचे अस्तित्व कमालीचे क्षीण आहे. त्यांचे अस्तित्व शोधावे लागते. यामुळे काँग्रेस, भाजपमध्ये दुहेरी लढत रंगणार आहे. यामुळे केवळ मतविभागणीसाठी अन्य पक्षांचे उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. निजद, बसपकडून उमेदवार देण्यात 
येणार आहेत. 

Tags :Constituency of chikkodi sadalaga prakash hukkeri belgaon news