Sat, Feb 29, 2020 11:41होमपेज › Belgaon › अधिवेशनापूर्वी काँग्रेसला मिळणार नवे प्रदेशाध्यक्ष

अधिवेशनापूर्वी काँग्रेसला मिळणार नवे प्रदेशाध्यक्ष

Last Updated: Dec 19 2019 11:44PM
बंगळूर : प्रतिनिधी

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद नियुक्ती 20 जानेवारीपूर्वी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रभावी नेते डी. के. शिवकुमार यांचे नाव चर्चेत आहे. आगामी तीन दिवसांत ते दिल्ली दौर्‍यावर जात असून लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

जुलैअखेरीस काँग्रेस-निजद आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपला सत्ता मिळाली. तेव्हापासून या पक्षाचा प्रभाव क्षीण होत आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाचे केवळ दोनच उमेदवार निवडून आले. यामागे अंतर्गत वाद, प्रदेश काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचा स्वार्थ, संघटना कमकुवत झाल्याची कारणे आहेत. सद्यस्थितीत पक्षाला प्रभावी नेतृत्वाची गरज आहे.

पोटनिवडणूक निकालानंतर प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी राजीनामे दिले. गुंडुराव यांचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. तर सिद्धरामय्यांना त्याच पदावर पुढे कार्यरत राहण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यांनी राजीनामा मागे घेतला नाही तर अन्य नेत्याची निवड केली जाणार आहे. गेल्या आठवड्यात डी. के. शिवकुमार यांनी दिल्ली दौरा केला होता. त्यांना प्रदेशाध्यक्षपद सांभाळण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी केली. त्यावेळी त्यांनी काही अटी समोर ठेवल्या.

या अटींचा विचार करुन जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, बंगळूर येथे सोमवारी पत्रकारांशी बोलताना शिवकुमार यांनी प्रदेशाध्यक्षपदी आपले नाव छापण्यास हरकत नसल्याचे विधान केले होते. यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.