Fri, Feb 28, 2020 22:43होमपेज › Belgaon › जोल्‍ले दाम्पत्यासमोर काँग्रेसचे आव्हान

जोल्‍ले दाम्पत्यासमोर काँग्रेसचे आव्हान

Published On: Apr 27 2018 12:52AM | Last Updated: Apr 26 2018 8:58PMनिपाणी : विठ्ठल नाईक

निपाणी आणि चिकोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत असून दोन्ही पक्ष विजयाचा विश्‍वास व्यक्‍त करत निवडणूक रिंगणात उतरले आहे. यंदा भाजपतर्फे निपाणीतून आ. शशिकला जोल्‍ले व चिकोडी-सदलग्यातून सहकारनेते अण्णासाहेब जोल्‍ले यांना उमेदवारी दिली आहे. या जोल्‍ले दांपत्याविरुध्द काँग्रेसने  निपाणीतून माजी आ. काकासाहेब पाटील व चिकोडी-सदलग्यातून आ. गणेश हुक्केरी यांना उमेदवारी दिल्याने आता जोल्ले दाम्पत्यासमोर विजयासाठी काँग्रेसने मोठे आव्हान उभे केले आहे.

आ. शशिकला जोल्‍ले यांनी गत पाच वर्षामध्ये निपाणी मतदारसंघात राबविलेली विकासकामे आणि यापूर्वी विजयाची हॅट्ट्रिक केलेल्या माजी आ. काकासाहेब पाटील यांनी राबविलेली शाश्‍वत विकासकामे पाहता निवडणुकीत कडवी झुंज द्यावी लागणार आहे. शिवाय यंदा माजी आ. प्रा. सुभाष जोशींचे पाठबळ काँग्रेसला मिळाले असून खासदार प्रकाश हुक्केरी यांनी विशेष करुन निपाणीत लक्ष घातल्याने आ. जोल्‍लेंना विजयासाठी झगडावे लागणार आहे.चिकोडी-सदलगा मतदारसंघात खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांनी मोठ्याप्रमाणात विकासकामे राबवून मतदारांना जणू आपलेसे करुन टाकल्याचे चित्र दिसून येते.

त्याठिकाणी सहकारनेते आण्णासाहेब जोल्‍ले यांना गणेश हुक्केरींच्या विरोधात मोठे आव्हान आहे. खासदार प्रकाश हुक्केरींनी कार्यकर्त्यांवर गणेश हुक्केरींच्या विजयाची जबाबदारी सोपवून स्वत: निपाणीत लक्ष घातल्याने आ. जोल्‍लेंसमोर विजयाचा मार्ग अत्यंत कठीण बनला आहे. एकीकडे जोल्‍ले दाम्पत्याने काँग्रेसच्या विरोधात प्रचारात आघाडी घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत शक्‍तिप्रदर्शन केले असले तरी काँग्रेसने ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमातून तितकीच ताकद दाखवून दिली आहे.

आ. शशिकला जोल्‍ले व सहकारनेते अण्णासाहेब जोल्‍ले या पती-पत्नीसमोर काँग्रेसचा पराभव करणे सहज शक्य नाही. निपाणीतून काकासाहेब पाटील यांना प्रा. जोशींचे मिळालेले पाठबळ, खा. प्रकाश हुक्केरींनी घातलेले लक्ष, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी आ. वीरकुमार पाटील, युवानेते उत्तम पाटील या सर्वांची ताकद मिळाली आहे. चिकोडी-सदलगा मतदारसंघ जणू काँग्रेसचा बालेकिल्‍ला म्हणून ओळखला जात असून खासदार प्रकाश हुक्केरींच्या विकासाभिमुख राजकारणासमोर अण्णासाहेब जोल्‍लेंना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. निपाणी आणि चिकोडी-सदलगा मतदारसंघात काँग्रेसने भाजपसमोर मोठे आव्हान उभे केल्याने दोन्ही पक्षाला विजयाचा मार्ग कठीण बनला आहे.

कडवी झुंज

निपाणी आणि चिकोडी-सदलगा मतदारसंघात भाजपने जोल्‍ले दाम्पत्याला उमेदवारी दिली आहे. निपाणी मतदारसंघात आ. जोल्‍लेंनी राबविलेली विकासकामे आणि सहकारनेते अण्णासाहेब जोल्‍लेंनी चिकोडी जिल्हा भाजप अध्यक्ष असताना कार्यकर्त्यांचे केलेले संघटन पाहता निवडणूक रंगतदार होणार आहे. दुसरीकडे निपाणीतून काकासाहेब पाटील यांना मिळालेले पाठबळ आणि चिकोडी-सदलगा मतदारसंघात हुक्केरी घराण्याला कार्यकर्त्यांची असलेली पसंती पाहता दोन्ही पक्षाला विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

बळ आणि बहुमत

निपाणीतून काकासाहेब पाटील यांना प्रा. जोशी, वीरकुमार पाटील, लक्ष्मणराव चिंगळे, खा. हुक्केरी, उत्तम पाटील यांचे मोठे बळ मिळाले आहे. आ. जोल्‍लेंनी मतदारसंघात मोठ्याप्रमाणात विकासकामे राबवून कार्यकर्त्यांचे बळ मिळविले आहे. आता हे बळ विजयासाठी कोणाला बहुमतात घेऊन जाणारे ठरणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क ऐकावयास मिळत आहे. निपाणी आणि चिकोडी-सदलगा मतदारसंघात निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे.

 

Tags : belgaon, belgaon news, Assembly election, Jolle couple, Congress challenge,