Sun, Sep 27, 2020 00:14होमपेज › Belgaon › सर्वच मतदारसंघात काँग्रेसची पीछेहाट

सर्वच मतदारसंघात काँग्रेसची पीछेहाट

Published On: May 25 2019 2:08AM | Last Updated: May 25 2019 12:18AM
बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी तीन मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. पण, लोकसभा निवडणुकीत आठपैकी एकाही मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य मिळवता आले नाही. त्याचा फटका उमेदवार डॉ. वीरूपाक्षी साधुण्णावर यांना बसला आहे.

बेळगाव ग्रामीण, गोकाक आणि बैलहोंगल मतदारसंघात काँग्रेसचे लक्ष्मी हेब्बाळकर, रमेश जारकीहोळी आणि महांतेश कौजलगी हे आमदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सुरेश अंगडी यांना टक्‍कर दिली होती. 78 हजारांनी हेब्बाळकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे यंदा हे अंतर कमी होईल, असा अंदाज काँग्रेस कार्यकर्त्यांत होता. पण, प्रत्यक्ष मतदान पाहता एकाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य मिळवता आलेले नाही. बेळगाव ग्रामीणमध्ये हेब्बाळकर यांनी 1 लाखाहून अधिक मते मिळवली होती. त्यामुळे किमान 80 हजार मते तरी डॉ. साधुण्णावर यांना मिळतील, असे वाटत होते. पण, प्रत्यक्षात या मतदारसंघातून केवळ 43 हजार 289 अशी मते मिळाली. तर या उलट सुरेश अंगडी यांनी तब्बल 1 लाख 17 हजार 9467 मते मिळाली. गोकाकमधून केवळ 44 हजार 920 मते मिळाली. तर अंगडी यांना 1 लाख 4 हजार 505 मते मिळाली. बैलहोंगल हा डॉ. साधुण्णावर यांचा घरचा मतदारसंघ. या मतदारसंघात काँग्रेसचे महांतेश कौजलगी हे आमदार आहे. या मतदारसंघातही डॉ. साधुण्णावर यांना केवळ 42 हजार 556 मते मिळाली. तर अंगडी यांना 80 हजार 125 मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघातच डॉ. साधुण्णावर यांना निम्म्याहून कमी मते मिळाली आहे. इतर चार मतदारसंघात अंगडी यांनाच चांगले मताधिक्य मिळाले. सुरेश अंगडी यांना बेळगाव ग्रामीण मतदारसंघात सर्वाधिक मते मिळाली आहेत. तर बेळगाव दक्षिण मतदारसंघात त्यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. आठही मतदारसंघांत अंगडी यांचेच वर्चस्व राहिल्यामुळे डॉ. साधुण्णावर यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला.

राजकीय साठमारीचा बळी?

उमेदवार जाहीर होण्यापासूनच काँग्रेसमध्ये जोरदार गटातटाचे राजकारण शिजत होते. रमेश जारकीहोळी यांनी जाहीरपणे काँग्रेस विरोधी भुमिका घेतली होती. तर दुसरीकडे अन्य नेत्यांचीही साथ डॉ. साधुण्णावर यांना लाभली नाही. त्यामुळे ते राजकीय साठमारीचा बळी ठरले, असे जाणकारांचे मत आहे.