Mon, Sep 21, 2020 17:27होमपेज › Belgaon › समिती नेते उद्या पवारांना भेटणार

समिती नेते उद्या पवारांना भेटणार

Last Updated: Feb 15 2020 12:52AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवारबेळगाव : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी आगामी काळात वेगाने घडामोडी घडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात रविवारी (दि. 16) मध्यवर्ती म. ए. समिती शिष्टमंडळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची भेट घेणार आहे, असे समजते.

शरद पवार गुरुवारी (दि. 13) सांगली आणि कोल्हापूर दौर्‍यावर होते. त्यावेळी मध्यवर्ती समितीच्या शिष्टमंडळाने कोल्हापुरात त्यांची रात्री भेट घेतली होती. त्यामध्ये सीमाप्रश्‍नी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विधिज्ज्ञ हरिष साळवे व इतर वकिलांशी चर्चा करून सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी तारिख मागण्याची विनंती समिती शिष्टमंडळाने केली होती. त्यावर पवार यांनी महाराष्ट्राचे महाधिवक्‍ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी चर्चा करून वकिलांची बैठक घेण्याची ग्वाही दिली होती. कार्यकर्त्यांच्या गराड्यामुळे कोल्हापुरात सीमाप्रश्‍नी सविस्तर चर्चा करता आली नाही. त्यामुळे पवार यांनी रविवारी मध्यवर्ती समिती शिष्टमंडळाने मुंबईला यावे, त्याठिकाणी सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले आहे. त्यामुळे समिती शिष्टमंडळ मुंबईला रवाना होणार असल्याचे समजते. येत्या काही दिवसांत सीमाप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्याआधी वकिलांशी चर्चा करावी, अशी मागणी समितीची आहे. फेब्रुवारी महिन्यात याबाबत वेगवान घडामोडी घडण्याची शक्यता आहे. 

महाविकास आघाडीमुळे वेग

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सीमाप्रश्‍न नव्याने चर्चेला आला आहे. सीमा समन्वय मंत्र्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. आता न्यायालयात सुनावणीची शक्यता असल्यामुळे आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव वेगाने सुरू झाली आहे.

 "