Mon, Sep 21, 2020 19:11होमपेज › Belgaon › महिलेच्या मृत्यूमुळे ‘सिव्हिल’मध्ये उद्रेक

महिलेच्या मृत्यूमुळे ‘सिव्हिल’मध्ये उद्रेक

Last Updated: Feb 15 2020 12:52AM
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

अपघातात जखमी झालेल्या महिलेचा वाटेतच मृत्यू झाला होता. मात्र, नातेवाईकांकडून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करून सेवेत असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण गुडे यांना मृत महिलेच्या नातलग महिलेने मारहाण केली. शुक्रवारी सकाळी 10.30 वा. जिल्हा रुग्णालयात ही घटना घडली. घटनेनंतर रुग्णालयातील सर्वच डॉक्टरांनी या महिलेला अटक करण्याची मागणी करून सेवा तीन तास बंद केली. एपीएमसी पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेऊन सायंकाळी उशिरा मारहाण करणार्‍या सुनंदा मारुती तळवार (रा. वंटमुरी) हिला अटक केली आहे.

लगमव्वा करियाप्पा कर्‍याप्पगोळ (वय 43, रा. गुडस, ता. हुक्केरी) असे मृत महिलेचे नाव आहे. गुडस (ता. हुक्केरी) येथे शुक्रवारी सकाळी 7 वा. दुचाकी अपघातात लगमव्वा जखमी झाल्या होत्या. घटप्रभा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केले. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉ. किरण गुडे यांनी या महिलेची वैद्यकीय तपासणी करून वाटेतच तिचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगितले. मृत लगमव्वाचा मृतदेह ताब्यात देण्याची मागणी एका नातलग महिलेने केली. तिला खासगी 

रुग्णालयात दाखल करण्याचे तिने सांगितले. दरम्यान, डॉ. किरण गुडे यांनी कायद्यानुसार रुग्णालयात दाखल झालेल्या अपघातातील मृत व्यक्‍तीचा पोलिसांकडून पंचनामा व उत्तरीय तपासणी आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी नातलग महिलेने आरडाओरडा करुन डॉ. गुडे यांनी किडनी व डोळे घेण्यासाठी आपल्या बहिणीला मारल्याचा आरोप केला. डॉक्टरांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करुन हल्‍ला केला. यात डॉ. किरण गुडे यांचे शर्ट फाटले.

ही घटना शहरात वार्‍यासारखी पसरली व जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन अतिदक्षता विभाग सेवा बंद केली. डॉक्टरांवर वारंवार हल्‍ले केले जात असून अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून हल्‍लेखोर महिलेला त्वरित अटक करण्याची मागणी केली. तोपर्यंत सेवा बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला. 

सर्व डॉक्टरांनी बिम्स संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. दरम्यान बिम्सच्या सीईओ सईदा आफ्रिनबानू बळ्ळारी यांनी व संचालकांनी घडल्या प्रकाराची माहिती घेतली. यावेळी मार्केट एसीपी नारायण बरमणी, गुन्हे विभागाचे महांतेश्‍वर जिद्दी व एपीएमसी  पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन माहिती घेतली. डॉक्टरांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने रुग्णांचे हाल होतील, हल्‍ला करणार्‍या महिलेला त्वरित अटक करुन कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन पोलिसांनी दिले. त्यानंतर डॉक्टरांनी सेवा बंद आंदोलन मागे घेतले. याबाबत एपीएमसी पोलिस स्थानकात तक्रार करण्यात आली आहे.

रुग्णांची गर्दी 

डॉक्टरवर हल्‍ला झाल्याच्या निषेधार्थ रुग्णालयातील रुग्ण नोंदणी सेवा तीन तास बंद करण्यात आले. यामुळे रुग्णांना ताटकळत बसावे लागले. यामुळे रुग्णांची गर्दी झाली होती.

 "