Fri, Oct 30, 2020 05:05होमपेज › Belgaon › बालदिन विशेष : विविध भाषा बोलूया...आत्मविश्‍वासाने वाढूया!

बालदिन विशेष : विविध भाषा बोलूया...आत्मविश्‍वासाने वाढूया!

Last Updated: Nov 13 2019 10:12PM
बेळगाव : शिवप्रसाद आमणगी

‘नमाना माय देशावर बहाळा प्यार असा’ हे वाचून तुम्हाला वाटेल की, मी काय वाचतोय. पण याचा अर्थ आहे ‘माझे माझ्या देशावर खूप प्रेम आहे’. अनेक भाषांतील शब्द बापरून हे वाक्य तयार झाले आहे. हो आणि चक्‍क ते केले आहे एका 5 वर्षांच्या चिमुकल्याने.  बहुभाषिक असल्याने  गुणवत्तेत, भाषा कौशल्यात भर पडते. ज्ञानाचा परिघ विस्तारायला आणि परिचयाचे वर्तुळ वाढायला नव्या भाषेची नक्‍कीच मदत होते.नवी भाषा शिकणार्‍या व्यक्‍तीत आत्मविश्वास अधिक असतो. भिन्न भाषा बोलणार्‍या आई-वडिलांमुळे, विविध भाषिक सवंगड्यांसोबत वावरताना आणि काहीवेळा अनुकरण करून पाच किंवा पाचहून जादा भाषा बोलण्यास शिकलेल्या बेळगावातील काही चिमुकल्यांच्या भावविश्‍वाचा बालदिनानिमीत्त घेतलेला आढावा...

आई-वडिलांच्या संस्कारामुळे अनेक भाषा येतात

हनुमाननगर येथील विजय देवाडिगा हे स्वतः 8 भाषा अस्खलित बोलतात. त्यांची मूळ भाषा तुळू. त्यामुळे त्यांच्या दोन्ही कन्या प्राथ्वी (वय 13) आणि प्रश्‍विता (वय 8) यादेखील आई-वडिलांच्या मातृभाषेमुळे, बेळगावातच जडणघडण झाल्यामुळे आणि शाळेच्या माध्यमातून तुळू, मराठी, कन्नड, हिंदी आणि इंग्लिश चांगले बोलतात. याबाबत बोलताना प्राथ्वी म्हणाली, अनेक भाषा बोलता येत असल्याने आपण आत्मविश्‍वासपूर्ण कार्यरत राहतो. तसेच इतरांमध्येही वेगळे उठून दिसतो. प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असलाच पाहिजे. मात्र अन्य भाषाही बोलता आल्यास त्याचा फायदाच होतो.त्यामुळे अनेक मित्र-मैत्रिणी जोडण्यास मोठी मदत होते. तसेच करिअरच्या अनेक संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात, असा  सल्ला मला वडील देत असतात.

ट्युशन टिचरचे ऐकून कोंंकणी शिकलो

गोंधळी गल्लीतील 11 वर्षीय शरण रमेश पुजारी हा चिमुरडा तुळू, मराठी, कन्नड, हिंदी, इंग्लिश आणि कोंकणी भाषा बोलतो. आई-वडील मुळचे उडपीचे. मात्र व्यवसायानिमीत्त बेळगावात आले आणि स्थायिक झाले. कोंकणी भाषा कशी येते, असे विचारले असता ट्युशनमधील टिचर  मोबाईलवर सतत कोंकणी बोलायच्या. ते शब्द कानावर पडत गेले आणि सहज कोंकणी बोलायला लागलो. जास्त भाषा बोलता येत असल्याने भारी वाटते.

जानव तमिळही बोलतो

मुळच्या गोंधळी गल्ली येथील आणि सध्या बंगळूर येथे असलेल्या श्‍वेता कंग्राळकर यांचा अवघा 5 वर्षांचा चिमुकला जानव प्रशांत गुणशेखर हा तेलगू, मराठी, तमिळ, हिंदी, इंग्लिश आणि कन्नड या सहा भाषा अस्खलित बोलतो. वडील तेलगू आणि आई मराठी भाषिक आहे आणि वास्तव्य असलेल्या परिसरात तामीळ लोकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मी तमिळही बोलायला शिकलो, असे जानव सांगतो. शाळेमुळे इंग्लिश, हिंदी आणि कन्नड भाषा बोलता येतात. 

 "