Sat, Sep 26, 2020 22:34होमपेज › Belgaon › निपाणीजवळ तवेरा गाडीची झाडाला धडक; बालक ठार

निपाणीजवळ तवेरा गाडीची झाडाला धडक; बालक ठार

Published On: Apr 20 2019 1:52AM | Last Updated: Apr 20 2019 1:52AM
निपाणी : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी जवळील 30 नंबर बिडी कारखान्याजवळ तवेरा वाहन झाडावर आदळल्याने बालक ठार, तर आठ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सायकांळी 6 च्या सुमारास झाला. अपघातातील जखमी व मृत हे मळगाव (ता. सावंतवाडी) व कुर्ला (मुंबई) येथील आहेत.

अभिनव अमर पेडणेकर (वय 2) असे मृत बालकाचे नाव आहे. तर गंभीर जखमींमध्ये अमर चंद्रकांत पेडणेकर (35), अनिकेत बाबू पेडणेकर (25), भक्‍ती अमर पेडणेकर (26), जयश्री चंद्रकांत पेडणेकर (26), विजय चंद्रकांत पेडणेकर (26), चंद्रकांत वसंत पेडणेकर (60,  रा. माळगाव) व मनस्वी हणमंत वराडकर (10) हर्षाली हणमंत वराडकर (12) रा. कुर्ला (मुंबई) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर कोल्हापूर येथील सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पेडणेकर हे कुटुंबीय मूळचे माळगाव येथील असून सध्या ते व्यवसायानिमित्त गुजरात येथे वास्तव्यास आहे. त्यांचा मुलगा विजय याचा 28 मे रोजी माळगाव येथे विवाह असल्याने चंद्रकांत हे आपली कुर्ला येथे राहणारी मुलगी व जावयाला भेटून नाती हर्षाली व मनस्वी या दोघींना घेऊन तवेरा कारने  निपाणीमार्गे माळगावला जात होते. 

त्यांचे वाहन महामार्गावरील 30 नंबर बिडी कारखान्याजवळ आले असता चालक अमर पेडणेकर याचा ताबा सुटला. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेले सिमेंटचे संरक्षण कठडे तोडून भरावावरून खाली जात वाहनाने झाडाला जोराची धडक दिली. त्यामुळे वाहनात सर्वजण अडकून राहिले. यामध्ये चालक अमर यांची मुलगा अभिनव याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर आठजण गंभीर जखमी अवस्थेत वाहनातच अडकून पडले.

घटनास्थळी पोेेलिस उपनिरीक्षक एच. डी. मुल्‍ला, सहाय्यक उपनिरीक्षक एम. जी. निलाखे, हावलदार बसवराज न्हावी, एस. एस. चिकोडी, राजू दिवटे, सुरेश होळेगार यांच्यासह पुंजलॉईडच्या भरारी पथकाचे निरीक्षक सचिन हुक्केरी यांनी धाव घेत जखमींना म. गांधी रुग्णालयात हलविले. प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविले.  अनिकेत वगळता इतर 7 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली. घटनास्थळाची दृष्य ह्रदयद्रावक होते.  किंमती साहित्य मोबाईल विखरुन पडले होते. उपनिरीक्षक मुल्‍ला यांनी वाहनातील मोबाईलच्या आधारे मृत व जखमींची माहिती मिळवून ती कुटुंबीय व नातेवाईकांना दिली.

मुलगा गमावल्याचे दु:ख आणि.....

या अपघातातील गंभीर जखमी पती-पत्नी अमर व भक्‍ती या दोघांना गंभीर दुखापत झाल्यानंतर त्यांनी डोळ्यांत अश्रू आणून आपला मुलगा अभिनव याला समोर दाखविण्याची उपस्थितांना विनवणी केली; मात्र बराच वेळ दोघांनाही अभिनवचे दर्शन न झाल्याने त्यांना जखमी अवस्थेत मुलगा गमावल्याचे दु:ख होऊन त्यांनी डोळ्यांत अश्रू आणीत ते बेशुद्ध झाले. त्यामुळे उपस्थितांची मने हेलावली.