Wed, Aug 12, 2020 20:50होमपेज › Belgaon › ‘हेस्कॉम’कडून शेतकर्‍यांची चेष्टा

‘हेस्कॉम’कडून शेतकर्‍यांची चेष्टा

Published On: Dec 13 2017 1:53AM | Last Updated: Dec 13 2017 1:53AM

बुकमार्क करा

चिकोडी ः प्रतिनिधी

ग्रामीण भागात निरंतर वीजपुरवठा केला जात असल्याचे ‘हेस्कॉम’ अधिकारी शेतकर्‍यांना खोटे सांगत आहेत. वारंवार पुरवठा खंडित करून शेतकर्‍यांची चेष्टा करीत असून ‘हेस्कॉम’ने लक्ष देऊन सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी आग्रह ता. पं.च्या  सामान्य सभेत सदस्यांनी केली. ता.  पं. अध्यक्षा उर्मिला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या  सभेत सदस्यांनी चिकोडी, सदलगा व निपाणी ‘हेस्कॉम’ अधिकार्‍यांना धारेवर धरले.

द्राक्षरस महामंडळाचे अध्यक्ष रविंद्र मिर्जे म्हणाले दोन महिन्यांनंतर दहावी परीक्षा सुरु होणार आहे. यामुळे विद्यार्थी अभ्यास, सराव करीत असतात. रात्री वीजपुरवठा खंडित केल्यास अभ्यास कसा करणार? यंदाच्या हंगामात ऊसतोडणी सुरु असल्यामुळे अतिरिक्त भारनियमन करता येत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. पण ग्रामीण भागात केवळ 3 तास पुरवठा केला जात असल्याचा आरोप केला.

नवलिहाळचे ए. एस. पाटील म्हणाले ‘हेस्कॉम’च्या दुर्लक्षामुळे संकणवाडी येथे चार, पाच शेतकर्‍यांची घरे जळाली. वाहिन्या ओढून बांधल्या नाहीत. ट्रान्स्फॉर्मर वेळेवर बदलण्यात येत नाही. नुकसानग्रस्त भागास भेट देऊन समाजकल्याण खात्याचे अधिकारी सर्व्हे करून गेले आहेत. पण अद्यापही भरपाई मिळाली नाही. समाजकल्याण खात्याचे साहाय्यक संचालक एस. एस. बडिगेर म्हणाले, दलित कॉलनीत विजेच्या दुर्घटना घडून नुकसान झाल्याचे खरे असून वरिष्ठांना अहवाल पाठविला आहे. भरपाई देणे खात्याच्या कार्यक्षेत्रात येत नाही.

उर्मिला पाटील म्हणाल्या, सर्व खात्यांच्या अधिकार्‍यांनी ता. पं.सदस्यांना विश्‍वासात घेऊन काम करावे. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना योग्य उत्तरे देऊन समस्या सोडवाव्यात. उपाध्यक्षा महादेवी नाईक, सदस्य वीरेंद्र पाटील, कलगौडा पाटील, काशिनाथ कुरणी, राजू पाटील, वीरेंद्रसिंह माने, प्रभाकर भीमन्नवर, टी.एस. मोरे उपस्थित होते. कार्यकारी अधिकारी के. एस. पाटील यांनी स्वागत केले.